दहा मार्चपासून राधानगरी -दाजीपूर रस्ता अवजड वाहनांसाठी बंद
४५ दिवस बंद हा रस्ता बंद राहील: रस्ता दुरुस्ती व नुतुनीकरणाच्या कामासाठी बंद
राधानगरी /प्रतिनिधी
निप्पाणी - देवगड या राज्यमार्गांवरील तळकोकणात जाणारा रस्ता राधानगरी ते दाजीपूर या रस्त्याच्या दुरूस्ती व नुतुनीकरणासाठी ४५ दिवस बंद करण्यात येणार, असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजीराव इंगवले यांनी दिली. या आशयाचे पत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवले आहे.
या रस्त्याच्या दुरुस्ती व नुतुनिकरनाचे काम करताना राधानगरी ते दाजीपूर रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करून हलक्या व लहान वाहनाकरता बालिंगा, महे पाटी, कोते, धामोड, शिरगांव, तारळे, पडळी, कारिवडे, दाजीपूर रस्ता वापर करणेस संयुक्तीत असून अवजड व मोठी वाहतूक सदरच्या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून कोकणातून कोल्हापूर कडे येणारी अवजड वाहने फोंडा -कणकवली फाटा -नांदगाव -तळेरे -वैभववाडी -गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळवण्यात यावी, तसेच कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता आंबोली -आजरा -गडहिंग्लज व संकेश्वर -गडीहिंग्लज -आजरा -आंबोली मार्गे वळविण्यात येणार आहे
१० मार्च ते ३० एप्रिल या ४५ दिवसाच्या कालावधीत राधानगरी ते दाजीपूर रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करून सदरची वाहतूक प्रास्तावित केल्याप्रमाणे वळवण्यात येणार आहे, जनतेच्या व वाहन चालकाच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशादर्शक चिन्हे व माहिती लावण्यात यावी अश्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.