Vikhe-Patil Kolhapur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात भाजपचाच झेंडा!
या नेत्यांना संबंधित परिसराची भौगोलिक परिस्थिती माहित असते.
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य रचना महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचनेसंदर्भात स्थानिक नेतेच अधिक प्रभावीपणे निर्णय घेऊ शकतील. कारण या नेत्यांना संबंधित परिसराची भौगोलिक परिस्थिती माहिती असते. पुनर्रचना करण्यासंदर्भातला प्रश्न फार जटिल नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीला यांनी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाबरोबर अन्य पक्ष कधीच येऊ शकत नाहीत. त्यामुळे अगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत राज्यात भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.
अलमट्टी धरणाच्या उंचीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, अलमट्टीमुळे धरणाच्या उंचीसंदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहेत. परंतु अद्यापही सर्वोच्च न्यायालयात त्याला स्थगिती आहे. राज्य सरकारने तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यांसोबत चर्चा केली आहे.
अलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही हीच राज्य सरकारची भूमिका आहे. अलमट्टीसंदर्भात राज्यसरकार न्यायालयात गेलेलं नाही असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. कारण मी स्वतः केंद्रीय जलमंत्रीसोबत याविषयी चर्चा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देखील यावर लक्ष ठेवून आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जयंत पाटील यांच्याशी फारसा संबंध नाही. परंतु त्यांनीही संघटनेचे अडचणीच्या काळातही नेतृत्व केले आहे. आता नवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे. पण त्यांची भाजपमध्ये येण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्टोक्ती विखे-पाटलांनी दिली आहे.
अजित पवार होणार मुख्यमंत्री होणार, या चर्चेवर पाटील म्हणाले, कोणी काय विचार करावा हा त्या राजकीय पक्षांचा प्रश्न आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे नेतृत्व कणखर आहे. भाजप विधानसभेमध्ये सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.