मानधनाच्या रक्कमेतून माजी सरपंचांनी दिले शाळांना कलर प्रिंटर
आमडोस गावच्या माजी सरपंच सौ.राधा वरावडेकर यांचा आदर्श
चौके/वार्ताहर
मालवण तालुक्यातील आमडोस गावच्या माजी सरपंच सौ.राधा वासुदेव वरावडेकर यांनी सरपंच पदावरती काम करत असताना गेल्या पाच वर्षांचे मिळालेले मानधन न घेता त्या मानधनाच्या मिळालेल्या रक्कमेतून आमडोस गावातील तीन शाळांना कलर प्रिंटर देऊन एक आगळा वेगळा आर्दश लोकप्रतिनिधींसमोर घालून दिला . त्यांच्या या उपक्रमाबाबत आमडोस गावामध्ये समाधान व्यक्त करून सौ.वरावडेकर यांना धन्यवाद देऊन अन्य लोकप्रतिनिधींनीही हा आदर्श अंगीकारावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आमडोस गावच्या माजी सरपंच सौ.राधा वरावडेकर यांनी गेली पाच वर्ष गावचे सरपंचपद यशस्वीपणे भूषविले या पाच वर्षाच्या काळात गावातील असंख्य विकासाची कामे मार्गी लावली.हे करीत असताना शासनाकडून जे सरपंचाना मानधन दिले जात असते ते मानधन आपल्या सरपंचपदाच्या पाच वर्षाच्या काळातील मानधन त्यांनी घेतले नाही .त्यांचा पाच वर्ष पदाचा कार्यकाळ पुर्ण झाल्या नंतर डिसेंबर महिन्यात संपूर्ण पाच वर्षांचे मानधन रु.४६, ४०० चा धनादेश माजी सरपंच सौ.वरावडेकर यांना देण्यात आला.या रक्कमेमध्ये स्वतःकडील काही रक्कम जमा करून एकुण ५०००० रू.पर्यतच्या किंमतीचे तीन कलर प्रिंटर विकत घेऊन आमडोस गावातील तीन शाळेंना भेट भेट देऊन हे तीनही कलर प्रिंटर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आले ..आपल्या सरपंच पदाच्या गेल्या पाच वर्षातील मिळणारे मानधन स्वतःसाठी खर्च न करता ते अश्या प्रकारे खर्च करून एक आगळा वेगळा आर्दश समाजामध्ये निर्माण केल्यामुळे संपूर्ण मालवण तालुक्यामधून आमडोस गावच्या माजी सरपंच सौ.राधा वरावडेकर यांचे अभिनंदन होत आहे.