अमेरिकेत भारतीयांसोबत होणारा वंशभेद अस्वीकार्य
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांचे मतप्रदर्शन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेत भारतीयांसोबत होणाऱ्या वंशभेदाच्या अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर भारताने कडक शब्दात मतप्रदर्शन केले आहे. भारतीयांच्या बाबतीत जगात कोठेही कोणत्याही स्वरूपातील होणारा वंशभेद अस्वीकार्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. अमेरिकेतील भारतीयांसोबत होणारा वंशभेद दर्शवणाऱ्या अलीकडील व्हायरल व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रतिक्रिया देताना रणधीर जयस्वाल यांनी हे मत व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याकडेही वंशभेदाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मार्को रुबियो यांनी भारतीयांविरुद्धच्या वंशद्वेषी टिप्पण्यांना मूर्ख लोकांचे कृत्य म्हटले होते. तसेच अमेरिका एक स्वागतशील देश असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला होता. जगभरातील लोक अमेरिकेत येऊन तेथील समाजात जुळवून घेत देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देतात असेही ते म्हणाले होते.
व्यापार करारासाठी अमेरिकी शिष्टमंडळ भारताला भेट देणार
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत माहिती दिली. एप्रिलमध्ये आमच्या एका व्यापारी शिष्टमंडळाने अमेरिकेला भेट दिली होती. आता, वाटाघाटी पुढे नेण्यासाठी अमेरिकेचे एक शिष्टमंडळ पुढील आठवड्यात भारताला भेट देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आतापर्यंत, आमची चर्चा खूप सकारात्मक आणि विधायक झाली आहे. आम्ही तुम्हाला या संदर्भात अद्ययावत माहिती देत राहू, असे जयस्वाल म्हणा