देसुरात शर्यतीच्या बैलाचा लम्पीमुळे बळी
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : अन्य चार-पाच गायींना लागण झाल्याची चर्चा
वार्ताहर/किणये
गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील विविध भागांमध्ये जनावरांना लम्पी रोगांची लागण झाली होती. पशुवैद्यकीय खात्यामार्फत जनजागृती करून व जनावरांना लस देऊन हा लम्पी रोग आटोक्यात आणला होता. मात्र देसूर गावात याच लम्पी रोगाची पुन्हा लागण होऊन शर्यतीच्या सर्जा बैलांचा बळी गेला आहे. यामुळे देसूर गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात अन्यही तीन ते चार गायींना लम्पी रोगांची लागण झाली असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. देसूर येथील रामा मष्णू पाटील यांच्या शर्यतीच्या सर्जा बैलाला लम्पी रोगाची लागण झाली व सोमवारी रात्री सुमारे दीड लाख रुपये किमतीचा बैल दगावला. यामुळे सदर शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या 14 दिवसापूर्वी बैलाला लम्पीची लागण झाली होती. तेव्हापासून आपण सरकारी व खासगी डॉक्टरांना आणून बैलावर शर्तीने उपचार केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. अखेर बैल दगावला अशी माहिती पाटील यांनी दिली.
गोठ्यातील अन्य जनावरांना लम्पी नाही
गोठ्यात अन्य दोन म्हशी व एक बैल आहे यांना लम्पी झाली नाही, असेही रामा यांनी सांगितले. एका बैलाला लम्पीची लागण झाल्यानंतर आपण इतर जनावरांची अधिक प्रमाणात काळजी घेतल्यामुळे अन्य जनावरे बचावली. बैलाच्या अंगावर फोड आल्याची येळ्ळूर येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांना माहिती दिली. त्यांनी बैलावर उपचार केले. तसेच बैलाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे खासगी डॉक्टरांना बोलावून उपचार केले. मात्र उपयोग झाला नाही.
जनावरांना पुन्हा लसीकरण करून घ्या
दगावलेल्या बैलाची तपासणी करण्यासाठी आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती विचारली असता, त्यांनी लम्पीमुळे बैल दगावला आहे. इतकीच माहिती दिली. तर उर्वरीत माहिती देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली. व आपण यापूर्वी गावात लसीकरण केले आहे, असेही सदर डॉक्टरांनी सांगितले. पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांनी देसूर गावात येऊन गावातील जनावरांची तपासणी करून पुन्हा एकदा लम्पी रोगासंबंधित लसीकरण करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.