राबडीदेवींनी पाठविले आंबे, लालूंशी होत नाही संभाषण : तेजप्रताप
पाटणा :
लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यांना 6 वर्षांसाठी राजद अन् परिवारातून हाकलण्यात आले आहे. पक्ष अन् परिवारातून हाकलण्यात आल्यापासून तेजप्रताप हे सातत्याने चर्चेत आहेत. कधी ते स्वत:च्या आईवडिलांसाठी भावुक संदेश सोशल मीडियावर लिहित आहेत. तर कधी स्वत:च्या निवासस्थानी जनता दरबार भरवत आहेत. माझी आई म्हणजेच राबडी देवी माझ्याकरता आंबे पाठवत असते. तर लालूप्रसाद यादवांशी कुठल्याही प्रकारचे संभाषण होत नाही. लालूप्रसाद हे माझे पिता असून त्यांचा आदेश माझ्यासाठी शिरसांवद्य आहे. लालूप्रसाद जे काही करतील ते आमच्यासाठी चांगलेच असेल, असे तेजप्रताप यांनी म्हटले आहे. राबडीदेवींशी माझे बोलणे होत असते. आई केवळ घरगुती विषयांवर बोलत असते. आईला माझ्या जेवणाची चिंता सतावत असते. तसेच ती काहीवेळा आंबे पाठविते तर काहीवेळा इतर सामग्री पाठवत असते, असे तेजप्रताप यांनी सांगितले आहे.