For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एप्रिल महिन्यात होणार लाळ्या-खुरकत लसीकरण

10:31 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
एप्रिल महिन्यात होणार लाळ्या खुरकत लसीकरण
Advertisement

जिल्ह्यातील पशुधनाला सुरक्षित राखण्यासाठी उपक्रम

Advertisement

बेळगाव : जनावरांचे रोग नियंत्रण उपक्रमांतर्गत लाळ्या-खुरकत प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम 1 ते 30 एप्रिलपर्यंत होणार आहे. प्रत्येक जनावराला लस देऊन हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले. शुक्रवारी यासाठीचे भित्तीपत्रक प्रदर्शित केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवार दि. 29 मार्च रोजी जनावरांचे रोग नियंत्रण अभियानाच्या पाचव्या फेरीत लाळ्या-खुरकत प्रतिबंधक लस देण्यासंबंधी अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला. घरोघरी जाऊन गाय, बैल, म्हैस व इतर जनावरांना लस देण्याचे ठरविण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. विसाव्या जनावरांच्या गणती अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 13 लाख 93 हजार 711 जनावरे आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या कमी आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर यांनी बैठकीत दिली. बेळगाव जिल्ह्यासाठी 11 लाख 20 हजार लस पुरवठा झाला आहे. लसीकरणाच्या चौथ्या अभियानाअखेर 1 लाख 65 हजार लस शिल्लक होत्या. त्यामुळे सध्या 12 लाख 85 हजार लस उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाळ्या-खुरकत प्रतिबंधक लस तालुका पातळीवर सहा शीतकरणाची व्यवस्था असलेल्या वाहनातून लस पाठवून कोल्डस्टोरेजमध्ये त्या साठविण्याची सूचना करण्यात आली आहे. यासाठी अथणी, बेळगाव, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, कागवाड, खानापूर, कित्तूर, मुडलगी, निपाणी, रामदुर्ग, बैलहोंगल, सौंदत्ती, यरगट्टी, रायबाग तालुक्यांच्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पुरवठा करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन जनावरांना लस देण्याची सूचनाही या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात 913 जणांची लस देणाऱ्यांची 457 पथके तयार करण्यात आली आहेत. रोजच्या रोज होणाऱ्या लसीकरणासंबंधी भारत पशुधन वेबसाईटवर नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. राजीव कुलेर यांनी दिली. पशुसंगोपन खाते व शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी पशुसखी कार्यरत आहेत. यापूर्वी 4 ते 8 महिने वयाच्या वासरांची गणती करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन पशुसखी जागृती करत आहेत. पाचव्या फेरीतील लसीकरण यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त लोकेश, जि. पं. चे मुख्य योजना संचालक गंगाधर दिविटर, कृषी खात्याचे शिवनगौडा पाटील आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. लसीकरणासंबंधी जागृती करणारी भित्तीपत्रके या बैठकीत प्रकाशित करण्यात आली.

Advertisement

 

Advertisement
Tags :

.