पशुसंगोपनतर्फे रेबीज पंधरवड्याला प्रारंभ
श्वानांना मोफत लस : अटकावासाठी विशेष मोहीम : 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन
बेळगाव : पशुसंगोपन खात्यामार्फत 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान रेबीज पंधरवडा साजरा केला जात आहे. याअंतर्गत विशेष मोहीम राबवून श्वानांना मोफत लस दिली जाणार आहे. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. 28 सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिन पाळला जातो. या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. जिल्ह्यात 76 हजार तर बेळगाव शहरात 20 हजारहून अधिक पाळीव कुत्र्यांची संख्या आहे. या सर्व श्वानांना लस टोचली जाणार आहे. संबंधित श्वान पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे. श्वानाबरोबर मांजर इतर प्राण्यांनाही प्रतिबंधक लस टोचली जाणार आहे. अलीकडे भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे रेबीजचा धोका अधिक निर्माण होऊ लागला आहे. याला आळा घालण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम
पशुसंगोपन खात्यातर्फे 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान रेबीजबाबत जागृती करण्यात आली आहे. शाळा आणि इतर ठिकाणी रेबीजचा प्रसार कसा होतो? याबाबत माहिती देण्यात आली आहे. शिवाय पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर कोणते उपाय घ्यावेत? याबाबतही जागृती करण्यात आली. आता 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत सर्व श्वानांना लस देण्यात येणार आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी (ता. बेळगाव) किणये येथील एका युवकाचा रेबीजने मृत्यू झाला आहे. शिवाय लहान मुले आणि भटक्या जनावरांवर कुत्र्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे रेबीजचा धोका उद्भवू लागला आहे. यासाठी खात्यामार्फत विशेष मोहीम राबविली जात आहे.
सर्व पशुपालकांनी सहकार्य करा
1 ते 15 सप्टेंबरदरम्यान रेबीजबाबत शाळास्तरावर जागृती करण्यात आली आहे. 15 ते 30 सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सर्व पशुपालकांनी सहकार्य करावे. शिवाय निरोगी कुत्र्यांनाही ही लस दिली जाणार आहे.
- डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक, पशुसंगोपन खाते)