जिल्ह्यात रब्बीच्या अडीच लाख हेक्टरवर पेरण्या
शेतकऱ्यांचे सव्वा चार लाख हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट : सर्वाधिक जोंधळ्याची पेरणी
बेळगाव : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून, पेरण्याही सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची कापणी शिल्लक असली तरी, जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरणीची कामे जोरदारपणे सुरू आहेत. यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 4 लाख 24 हजार 609 हेक्टर प्रदेशात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत 2 लाख 51 हजार 902 हेक्टर भागात पेरण्या करण्यात आल्या आहेत. तर अद्याप 1 लाख 72 हजार 707 हेक्टर प्रदेशात पेरण्या होणे बाकी आहे.
यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. यानंतर शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेऊन खरीप हंगामातील पेरणीची कामे करून घेतली. मात्र अतिवृष्टी झाल्याने शिवारात पाणी आले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. यानंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून घेतली. मात्र यानंतरही सतत पाऊस असल्याने दुबार पिकांमध्ये पाणी आल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले. मात्र काही प्रमाणात पिके हाती लागल्याने विविध भागांत पिकांची कापणी करून घेण्यात आली. पण बहुतांश ठिकाणी कापणी करणे शिल्लक आहे.
कापणी केल्यानंतर शेतकरी रब्बी हंगामाच्या कामात गुंतलेले असतात. यंदा जिल्ह्यात कृषी खात्याने 4 लाख 24 हजार 609 हेक्टर प्रदेशात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जोंधळ पिकाचे 1 लाख 38 हजार 973 हेक्टर प्रदेशात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी 1 लाख 3 हजार 311 हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे. यानंतर हरभरा पिकांचे 1 लाख 30 हजार हेक्टरमध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यापैकी 1 लाख 9 हजार 329 हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे.
सर्वाधिक पेरण्या सौंदत्ती तालुक्यात
जिल्ह्यात रब्बी हंगामातील सर्वाधिक पेरण्या सौंदत्ती तालुक्यात 62 हजार 739 हेक्टरमध्ये झाल्या असून, यानंतर अथणी तालुक्यात 42 हजार 754 पेरण्या करण्यात आल्या आहेत.अद्याप भातासह इतर पिकांची कापणी शिल्लक असल्याने बेळगाव तालुक्यात काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. बेळगाव तालुक्यात 3 हजार 717 हेक्टरमध्ये पेरण्या झाल्या आहेत. मात्र खानापूर तालुक्यात अद्याप पेरण्या करण्यात आलेल्या नाहीत. पिकांची कापणी झाल्यानंतर दोन्ही तालुक्यातही पेरणी कामांना जोर येणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक जोंधळा 1 लाख 3 हजार 311 हेक्टर प्रदेशात पिकाची पेरणी झाली आहे. यानंतर हरभरा 1 लाख 9 हजार 329, मका 12 हजार 82, ऊस 12 हजार 8, गहू 11 हजार 58 तर इतर पिकांची 4 हजार 114 हेक्टर प्रदेशात पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 2 लाख 51 हजार 902 हेक्टर प्रदेशात पेरण्या झाल्या आहेत. अद्याप 1 लाख 72 हजार 707 हेक्टरमध्ये पेरण्या शिल्लक आहेत. एकंदरीत जिल्ह्यात 59 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. काही दिवसांत पेरणी कामांना जोर येणार असून उद्दिष्ट गाठणे शक्य होणार आहे.