आर. प्रज्ञानंदची दुसऱ्या स्थानावर झेप
सुपरबेट रॅपिड, ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा
वृत्तसंस्था/ वॉरसॉ, पोलंड
खराब सुरुवात झाल्यानंतर भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने मुसंडी मारत एकंदर क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सुपरबेट रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतील ब्लिट्झ विभागातील निम्मा टप्पा पूर्ण झाला आहे. ही स्पर्धा ग्रँड चेस टूरचा भाग आहे.
सलग दुसऱ्या दिवशी प्रज्ञानंदने चांगली कामगिरी केल्याने तो चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. रॅपिड विभागातील पहिल्या दोन दिवशी त्याची कामगिरी फराशी समाधानकारक झाली नव्हती. पण ब्लिट्झ विभागात त्याने शानदार कामगिरी करून मुसंडी मारली आहे. पाच मिनिटांचा प्रत्येक डाव आणि प्रत्येक चालीनंतर तीन सेकंदाची वाढ असताना प्रज्ञानंदने नेहमीचा गुंतागुंतीचा खेळ केला आणि सलग तीन विजय नोंदवले. त्याने रोमानियाचा डीअॅक बॉग्डन-डॅनियल व अमेरिकेचा लेव्हॉन अॅरोनियन यांच्याकडून पराभूत होत या विभागाची सुरुवात केली होती. पण नंतर त्याने स्वत:ला सावरत फ्रान्सच्या फिरोझा अलिरेझा व मॅक्झिम वॉशियर लॅग्रेव्ह विजय मिळविले.शेवटच्या तीन फेऱ्यांत त्याने बल्गेरियाचा माजी वर्ल्ड चॅम्पियन व्हेसेलिन टोपालोव्ह, भारताचा अरविंद चिदंबरम आणि रोमानियाचा डेव्हिड गॅवरिलेस्क्यू यांच्याविरुद्ध खेळत एकूण 9 सामन्यांत 5.5 गुण मिळविले.
भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमला मात्र अपेक्षित प्रदर्शन करता न आल्याने 9 सामन्यांत त्याला 3.5 गुणच मिळविता आले. स्लोव्हेनियाचा ब्लादिमिर फेडोसीव्हने उपांत्य दिवशी 9 पैकी 8 गुण घेत शानदार प्रदर्शन केले. त्याचे एकंदर 27 पैकी 19 गुण झाले आहेत. प्रज्ञानंदपेक्षा तो तब्बल 3.5 गुणांनी पुढे आहे. उर्वरित सामन्यात मोठा फेरबदल न झाल्यास उरलेल्या 9 डावांत फेडोसीव्हने 4.5 गुणांची कमाई केल्यास त्याचे जेतेपद निश्चित होईल.
अरविंदने पहिल्या चार डावांत 2.5 गुण घेत सुरुवात केली. पण नंतरच्या पाच डावांत त्याला केवळ एक गुण मिळविता आला. रॅपिड विभागात त्याने संयुक्त अग्रस्थान मिळविले. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी त्याला ब्लिट्झच्या उत्तरार्धात मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
रॅपिड व ब्लिट्झच्या 9 फेऱ्यानंतरची गुणवारी : 1) फेडोसीव्ह 19 गुण, 2) आर. प्रज्ञानंद 15.5 गुण, 3-5) अरविंद चिदंबरम, लेव्हॉन अॅरोनियन, मॅक्झिम वॉशियर लॅग्रेव्ह, प्रत्येकी 14.5 गुण, 6) फिरोझा अलिरेझा 14 गुण, 7-8) डुडा जान क्रीस्तॉफ, बॉग्डन डॅनियल प्रत्येकी 13 गुण, 9) डेव्हिड गॅव्हरिलेस्क्यू 9 गुण, 10) टोपालोव्ह 8 गुण.