आर. के. सिंह यांचा भाजपला रामराम
निलंबनानंतर प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते आर. के. सिंह यांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए युतीच्या प्रचंड विजयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता पक्षातून काढून टाकल्यानंतर लगेचच आर. के. सिंह यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा यांच्याकडे त्यांनी आपले राजीनामापत्र पाठविले आहे. बिहारमधील आरा येथील माजी खासदार गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि एनडीएवर तीव्र शब्दात टीका करत होते. त्यांनी नितीश कुमार सरकारवर असंख्य आरोप करत होते. बिहारमधील एका वीज प्रकल्पाच्या कामकाजात घोटाळा झाल्याच्या त्यांच्या आरोपांमुळे राज्य निवडणुकीच्या काही दिवस आधी मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. आरोप सुरू असताना भाजपने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, परंतु निवडणूक निकाल जाहीर होताच त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले.