आर. के. नगर येथे अतिक्रमण काढून महिना झाला तरी रस्ता रुंदीकरणाला सुरुवात नाही
पाचगाव वार्ताहर
आर के नगर मुख्य चौकातील सुमारे 40 टपऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणासाठी काढून महिना झाला तरी अद्याप रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली नाही. यामुळे नागरिकांमधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मोरेवाडी ते आर के नगर मंडलिक बोअर पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मागील महिन्यात 18 तारखेला आर के नगर चौकातील रस्त्या शेजारी असणाऱ्या सुमारे 40 विविध खाद्यपदार्थांच्या टपऱ्या काढण्यात आल्या.
या टपऱ्या काढल्यानंतर लगेचच रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आता टपऱ्या काढून एक महिना झाला तरी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
काही टपरी चालकांनी आर के नगर चौकात ढकलगाडा आणून पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना अडथळा व्हावा यासाठी पंधरा दिवसांपूर्वी चौकात रस्त्या शेजारी खडीचे डंपर आणून ओतण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही काम सुरू केलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कामकाजाच्या पद्धती बद्दल वाहनधारक व परिसरातील नागरिकांमधून तीव्र संतोष व्यक्त होत आहे.