For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

झटपट श्रीमंती? छे... ही तर निव्वळ अधोगती!

12:15 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
झटपट श्रीमंती  छे    ही तर निव्वळ अधोगती

नोटा दुपटीचे आमिष : कोट्याधीशही बनले कंगाल : सावधगिरी बाळगा नाहीतर याल रस्त्यावर : गुप्तधन खरेदी करण्यासाठी तर अनेकांनी घालवली आयुष्यभराची कमाई

Advertisement

बेळगाव : जोपर्यंत फशी पडणारे असतात, तोपर्यंत फसवणाऱ्यांची चलती असते. झटपट श्रीमंतीच्या नादाला लागून अनेकजण देशोधडीला लागतात. सध्या बेळगाव परिसरात चर्चेत असलेल्या नोटा दुप्पट करणाऱ्या टोळीमागची कहाणीही अशीच आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे तरुण केवळ सावजांना ठकविण्यासाठी एकत्र येतात. नोटांच्या बंडलांचे फोटो दाखवून सावजाला भुरळ घातली जाते. खरोखरच नोटा दुप्पट केल्या जातात का? याची पुसटशीही कल्पना नसणारे सावज त्यांच्या भूलथापांना बळी पडते. 17 डिसेंबर 2023 रोजी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील होनग्याजवळ नोटा दुप्पट करण्याचा एक व्यवहार झाला. गोकाक येथील सिद्धाप्पा चन्नगौडा बिरादार व जमखंडी येथील त्यांचे नातेवाईक गुरुराज विरनगौडा बिरादार यांना नोटा दुप्पट करून देण्याचे सांगून बेळगावला बोलाविलेले असते. होनग्याजवळ रस्त्याशेजारी व्यवहार होतो. 25 लाख रुपये खऱ्या नोटा घेऊन टोळीतील गुन्हेगार तेथून पसार होतात.

नोटा दुप्पट करणाऱ्या टोळीत एक महिलाही असते. तिने आपले नाव जान्हवी असे सांगितलेले असते. सावजांना मोबाईलवर एक फोटो दाखविलेला असतो. त्या फोटोमध्ये अक्षरश: नोटांची बंडले असतात. आमच्याजवळ खूप पैसा आहे. 25 लाख रुपयांच्या बदल्यात 50 लाख रुपये देऊ, असे सांगत सिद्धाप्पा व गुरुराज यांना बेळगावला बोलाविलेले असते. नोटा दुप्पट करणाऱ्या टोळ्या ज्या पद्धतीने सावजाला फसवतात, त्याच पद्धतीने खऱ्या नोटा हातात मिळाल्यानंतर पोलीस आल्याचे सांगून गुन्हेगार तेथून पळ काढतात. ‘डबलिंग’ या नावाने ओळखले जाणारे नोटा दुप्पट करण्याचे व्यवहार काही नवे नाहीत. या व्यवहारासाठी एकेकाळी बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा व धारवाड प्रसिद्ध होते. कॉम्प्युटरचा जमाना सुरू होण्याआधी नोटांच्या आकाराचे पांढरे कागद कापून त्याच्या वर-खाली खऱ्या नोटा ठेवल्या जायच्या. आता प्रिंटरवर छापलेल्या बनावट नोटांची बंडलेच सावजाला दाखविली जातात. खासकरून एखाद्या हॉटेल किंवा खोलीत हा व्यवहार केला जातो.

Advertisement

डबलिंगच्या नादाला लागून अनेकजण कंगाल

Advertisement

डबलिंगच्या नादाला लागून अनेक धनिक कंगाल झाले आहेत. 10 लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात 20 लाखांच्या खऱ्या नोटा कशा मिळणार? याचा विचारही केला जात नाही. म्हणून सावज फसत जाते. या टोळ्यांनी डबलिंगनंतर नागमणी, गजमणीचा व्यवहार सुरू केला. त्याची पद्धतही डबलिंगसारखीच आहे. सावजाने खऱ्या नोटा गुन्हेगारांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस धाड टाकतात. खऱ्या नोटांसह गुन्हेगार पळून जातात. पुढे काय करायचे? या विचारात सावज तेथेच बसते. अनेकवेळा छापा टाकणारे पोलीस खरेही असतात. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यवहार झाल्यानंतर छापा टाकला जातो. पोलीस खऱ्या गुन्हेगारांना सोडून जो नोटा खरेदीसाठी आला आहे, त्याला पोलीस स्थानकात घेऊन जातात. बनावट नोटांचा व्यवहार करतोस, असा आरोप करून त्याला पोलीस स्थानकात बसवतात. त्याच्याकडूनही आपला वाटा मिळाल्यानंतर त्याला सोडून देतात. अशा प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा दोन्ही बाजूने फायदा होतो. अनेक अधिकाऱ्यांनी अशा टोळ्यांच्या नादाला लागून नोकऱ्या गमावल्या आहेत.

सीसीटीव्ही फुटेजवरून तपास

18 डिसेंबर रोजी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाल्यानंतर जिथे व्यवहार झालेला असतो, त्या ठिकाणी आढळलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून व सावजाशी संपर्क करण्यासाठी वापरलेल्या मोबाईल क्रमांकावरून काकतीचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सात जणांना अटक केली आहे. जान्हवी नावाने ओळखणारी महिला प्रत्यक्षात दीपा आवटगी आहे. पोलिसांनी दीपासह शिवानंद मठपती, अप्पय्या पुजारी, सुनील विभूती, सचिनकुमार आंबली, भरतेश अगसर, शशांक रावसाहेब दो•ण्णावर या सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून दोन कार व 11 लाख रुपये रोख रक्कम असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टोळ्यांचे पोलीस दलासमोर आव्हान

या टोळीतील गुन्हेगार हुक्केरी, संकेश्वर, निडसोशी, मुधोळ परिसरातील आहेत. काही प्रमुख आरोपींना अद्याप अटक व्हायची आहे. डबलिंग, नागमणी, गजमणी, वनमानव, पुरातन सोन्याची नाणी, कासव, घुबड, दुतोंडी साप, राईस पुलरच्या व्यवसायात गुंतलेल्या अनेक टोळ्या अद्याप कार्यरत आहेत. या टोळ्यांनी पोलीस दलासमोर आव्हानच उभे केले आहे. खोदकामाच्या वेळी जमिनीत आढळून आलेले गुप्तधन खरेदी करण्यासाठी तर अनेकांनी आयुष्यभराची कमाई घालवून बसले आहेत. सर्वात जास्त फसवणूक राईस पुलरच्या नावाने केली जाते. तांदूळ खेचणारा धातू ज्याच्याजवळ आहे, तो कोट्याधीश होणार, अशी थाप मारून सावजाला कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला जातो. बेळगाव परिसरातील अनेक उद्योजक अक्षरश: या धातूच्या नादाला लागून कंगाल झाले आहेत.

Advertisement
Tags :
×

.