भाजपकाळात नोकऱ्यांसाठी तरुणांच्या रांगाच रांगा
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका
पणजी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जाहीर केलेल्या मोजक्याच नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांच्या रांगा पर्वरी येथे लागलेल्या असून, आमच्या तरुणांचे असे हाल बघणे त्रासदायक आहे, अशी खंत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सोमवारी व्यक्त केली. प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजपने केलेल्या जुमल्यांचा हा परिणाम आहे. जिल्हा परिषद, पंचायत, विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक असो, प्रत्येक निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील युवकांना 10 हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे आता काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजप गोव्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवत असल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप तरुणांच्या नोकऱ्यांसाठी लागलेल्या लांब रांगातून खरा ठरत आहे, असे आलेमाव म्हणाले. पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार गोव्यातील बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे. ‘एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांनी नोकऱ्यांचे आश्वासन दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणतात सर्वांना नोकऱ्या देता येणार नाहीत. याचाच अर्थ मुख्यमंत्री सावंत यांनी मतदार आणि तरुणांना खोटी आश्वासने दिली आणि त्यांची दिशाभूल केली आहे,’ असे आलेमाव म्हणाले. गोव्यातील तरुणांना नोकरी शोधण्यासाठी परदेशात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, कारण ज्या नोकऱ्यांची जाहिरात केली जाते, ती जवळच्या व्यक्तींसाठी किंवा ’कॅश फॉर जॉब’साठी बुक केली जाते असे आलेमाव पुढे म्हणाले.