परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका उत्तरासह यूट्यूबवर
झाराप :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (महाराष्ट्र, पुणे) यांच्या ‘स्टार्स’ प्रकल्पांतर्गत घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन-2 अर्थात ‘पॅट’ प्रश्नपत्रिका परीक्षेच्या अगोदरच थेट उत्तरासह यूट्युबवर दाखल झाल्याने या परीक्षा नेमक्या कशासाठी?, याबाबत विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गतवर्षी या परीक्षांबाबत असाच प्रकार घडला होता. राज्यासह जिल्हाभरात या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. दरम्यान, संबंधित चॅनेल्सवर ‘एफआयआर’ दाखल झाल्याची माहिती प्रसारित झाली आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा- संकलित मूल्यमापन-पॅट चाचण्यांचे आयोजन एकाचवेळी करण्यात येत आहे. यापैकी नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात झ्Aऊ (पिरिऑडिक असेसमेंट टेस्ट) अंतर्गत मराठी, इंग्रजी, गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिका थेट राज्यस्तरावरून पुरविण्यात येतात. शासनाच्या एऊARए प्रकल्पांतर्गत हा उपक्रम चालतो. मंगळवारपासून ही परीक्षा सुरू झाली. मात्र, परीक्षेच्या अगोदरच मराठी, इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह फुटल्या आहेत.
‘पॅट’ अंतर्गत होणाऱ्या या परीक्षेसाठी शासनाकडून विहित यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परीक्षा संचलन काळात अधिकाऱ्यांच्या भेटी, विशेष देखरेख, विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती आदीबाबत गांभीर्याने घेतले जात आहे. पॅटच्या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका वेळेत तपासून प्रश्ननिहाय गुणवार सांख्यिकीय माहिती शासन दरबारी सादर करण्याच्या सक्त सूचनाही करण्यात आल्या आहेत. मात्र, पेपर फुटू नयेत, यासाठीचे प्रतिबंधात्मक धोरण कुचकामी ठरले आहे.
पॅट परीक्षेचे गांभीर्य अबाधित राहवे म्हणून प्रश्नपत्रिकांबाबत शाळास्तरावर शिक्षकांनाही विशेष मार्गदर्शनात्मक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न समजला नसेल, तर शिक्षकांनी संबंधित प्रश्न विद्यार्थ्यांना समजून सांगावा. मात्र, त्या प्रश्नाबाबत उत्तराचे कोणतेही संकेत देऊ नयेत, असे सूचित करण्यात आले आहे. असे असताना पॅटच्या प्रश्नपत्रिका शाळेत पोहोचण्याच्या अगोदरच समाज माध्यमावर थेट उत्तरासह प्रसारित होत असल्याने गुणवत्तेच्या नावाखाली घेण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या परीक्षा तत्त्वालाच हरताळ फासला जात असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेबाबत मोठा गाजावाजा करून घेतल्या जाणाऱ्या या पॅटच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका जर उत्तरासह काही दिवस अगोदर विद्यार्थ्यांना मिळत असतील, तर नेमकी कोणती गुणवत्ता शासनाला सिद्ध करायची आहे?, असा सवाल शिक्षण वर्तुळातून विचारला जात आहे. गतवर्षी या उपक्रमातील काही प्रश्नपत्रिका उत्तरासह यूट्यूबवर प्रसारित झाल्या होत्या. मागचा अनुभव लक्षात घेता शासनाने यावेळी अधिक खबरदारी घ्यायला हवी होती, असे मत पालकांनी व्यक्त केले.
- शिक्षकांकडून मेल रवाना
एकूणच पॅटच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह यूट्यूबवर प्रसारित होण्याच्या या कृतीला जिल्ह्यातील शिक्षकांकडून आव्हान देण्यात येत आहे. काही शिक्षकांनी या घातक कृतीबाबत ई-मेलवरून शासनाचे लक्ष वेधले आहे. पॅट अंतर्गत मराठी, इंग्रजी, गणित या विषयांच्या सरकारी प्रश्नपत्रिका घेण्यात येत असल्या, तरी शाळा स्तरावरून या विषयांच्या परत वार्षिक परीक्षा घ्याव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे काही इयत्तांसाठी या विषयाच्या दुबार परीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहेत.
शिक्षकांना वार्षिक परीक्षेबरोबरच पॅटच्या या तीन विषयांच्या दुहेरी प्रश्नपत्रिका तपासणे, त्याचे निकाल त्वरित तयार करून शासनाला सादर करणे, याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी दुबार परीक्षा असल्याने वेळेच्या नियोजनाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरवर्षी पंधरा एप्रिलपर्यंत संपणाऱ्या वार्षिक परीक्षा यावेळी दहा-बारा दिवस पुढे सरकल्या आहेत. एक मे रोजी निकाल द्यायचा असल्याने मूल्यांकनासाठी कमी कालावधी मिळणार आहे. या वर्षाचे परीक्षा नियोजनही शासनाने लवकर जाहीर केले नसल्याने शालाबाह्या परीक्षा, विविध प्रकारची होणारी शिबिरे यांच्या नियोजनात अडथळा आल्याची चर्चा पालकांतून होत आहे.
पंधरा-वीस पृष्ठांच्या आहेत प्रश्नपत्रिका
पॅट अंतर्गत तयार केलेल्या प्रश्नपत्रिका विषयनिहाय दहा ते वीस पृष्ठांच्या आहेत. एकूणच प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा दर्जा अभ्यासपूर्ण असून विशेष असाच आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचून, समजून घेऊन आपल्या क्षमता परीक्षेच्या माध्यमातून तपासून पाहायच्या आहेत. मात्र, उत्तरासह प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना अगोदरच मिळत असतील, तर अशा परीक्षेचा मूळ उद्देश कसा सफल होणार? त्यामुळे प्रश्नपत्रिकांच्या छपाईसाठी करण्यात आलेला एवढा मोठा खर्च नेमका कशासाठी व कोणासाठी?, अशा प्रतिक्रिया शिक्षण तज्ञांकडून व्यक्त होत आहेत.
वीसहून अधिक चॅनेल्सवर एफआयआर
दरम्यान, याबाबत सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी संकलित मूल्यमापन चाचणी-2 च्या गोपनियतेचा भंग केल्याबद्दल सुमारे वीसहून अधिक यूट्यूब चॅनेल्सची यादी घोषित करत त्यांच्यावर एफआआर दाखल करीत असल्याची माहिती माध्यमावर प्रसारित झाली आहे.
- परीक्षांची विश्वासार्हता धोक्यात-वामन तर्फे
मंगळवारपासून पॅट परीक्षा सुरू झाली. परंतु आज झालेल्या पॅट परीक्षेचे पेपर काही यूट्यूब चॅनेल्समार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले, ही बाब गंभीर आहे. याची बातमी आमच्यापर्यंत आल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ही बाब संचालकांच्या निदर्शनास आणून देण्याची मागणी केली आहे. अशा पद्धतीने पेपर फुटत असतील, तर शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांची विश्वासार्हता धोक्यात येऊन पालक आणि शिक्षक यांच्या दृष्टीने हे योग्य ठरत नाही. याबाबत शिक्षण विभागाने आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांनी व्यक्त केली.