सावंतवाडीत विजेचा खेळखंडोबा ; नागरिक आणि व्यावसायिक संतापले
महावितरणच्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहर आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा आता असह्य झाला आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून वीज गायब असल्याने व्यावसायिक, नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आठवडा बाजाराचा दिवस असूनही वीज नसल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले, ज्यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने जनजीवन विस्कळीत
गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडीत दिवसातून आणि रात्रीतून किमान पंधरा वेळा वीज खंडित होत असल्याने रहिवासी आणि व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी आहे. सध्या विविध अभ्यासक्रमांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची लगबग सुरू असताना, विजेच्या या लपंडावामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका थेट सामान्य जनतेला बसत असून, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. व्यवसायांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तांत्रिक बिघाड असो, जीर्ण झालेल्या तारा असोत किंवा अन्य कोणतीही कारणे असोत, यावर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत. हा प्रश्न त्वरित न सोडवल्यास नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सावंतवाडीतील नागरिक, व्यावसायिक आणि विद्यार्थी महावितरणकडे अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत. महावितरणने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आहे, जेणेकरून सावंतवाडीकरांना या त्रासातून मुक्ती मिळेल.