संरक्षकच भक्षक झाले आहेत का?”
सावंतवाडी वनविभाग कार्यालय परिसरातील वृक्षतोडीवर डॉ. जयेंद्र परुळेकरांचा सवाल
सावंतवाडी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक (डीएफओ/डीसीएफ) कार्यालय परिसरात झालेली वृक्षतोड सध्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे, त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. असे पर्यावरण प्रेमी डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे. माननीय उच्च न्यायालयाने २२ मार्च २०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह गावांमध्ये निसर्ग संरक्षणासाठी टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, उपवनसंरक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हे महत्त्वाचे सदस्य आहेत. तसेच संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोडीवर कडक बंदी घालण्यात आलेली आहे.अशा परिस्थितीत, टास्क फोर्समधील प्रमुख सदस्य असलेल्या उपवनसंरक्षकांच्या कार्यालय आणि निवास परिसरातच अनेक वर्षे जपलेले मोठे वृक्ष तोडण्यात आल्याची बाब आश्चर्यकारक आणि संशयास्पद मानली जात आहे. या वृक्षतोडीमागे नेमकी कोणती विकासकामे आहेत, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.विकासनिधी खर्च करण्यासाठी किरकोळ कारणे पुढे करून वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याची टीका होत असून, “संरक्षकच भक्षक झाले आहेत का?” असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींकडून विचारला जात आहे.सरमळे, कोलझर यांसारख्या इतर इको सेन्सिटिव्ह गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व घटनांमध्ये काही दुवा आहे का, आणि या मागील खरे कारण काय, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.“विकास” या नावाखाली निसर्गाची होणारी हानी थांबवली नाही, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशीही चिंता व्यक्त होत आहे.