आजगाव ड्रोन सर्व्हे प्रकरणात अटक का नाही ?
डॉ. जयेंद्र परुळेकरांचा सवाल
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडीत विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून नगराध्यक्षांवर होत असलेल्या आरोपांमुळे राजघराण्याची प्रतिमा मलिन होत असल्याची टीका माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली. तसेच आजगावातील ग्रामसभेच्या ठरावांना डावलून ड्रोन सर्व्हे करणाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. परुळेकर म्हणाले की, सावंतवाडी संस्थानला पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांचा गौरवशाली वारसा लाभला आहे. जेव्हा अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा नव्हत्या, तेव्हा सावंतवाडीत वीज, चांगले रस्ते आणि रुग्णालये उपलब्ध होती. या सर्व विकासाचे श्रेय पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांना जाते. मात्र, आजच्या पिढीला त्या वारशाचा विसर पडल्याचे दिसत आहे.गॅस पाईपलाईनच्या कामांमुळे शहरात वाहतूक कोंडी होत असून रिक्षा अडकणे, नागरिक पडणे अशा घटना घडत आहेत. हा विकास लोकहितासाठी आहे की हप्तेखोरीसाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नगरपरिषदेतील कामांसाठी राजवाड्यात जावे लागते, असे आरोप होत असून त्यामध्ये तथ्य असल्याचे वाटू लागल्याची टिप्पणीही त्यांनी केली.मोती तलाव सुशोभीकरणाच्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सावंतवाडीला कृत्रिम सुशोभीकरणाची गरज नसून या कामाच्या नावाखाली तलावाचे विद्रूपीकरण होणार नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. फुटपाथच्या कामांवरही त्यांनी निकृष्ट दर्जाचा आरोप केला.राजघराण्याबद्दल आदर व्यक्त करताना त्यांनी पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज, शिवरामराजे आणि राजमाता सत्वशीलादेवी यांच्या कार्याचा उल्लेख केला. कलावंतांना आश्रय देणाऱ्या आणि लोकहिताचे कार्य करणाऱ्या या परंपरेचा आदर्श सध्याच्या पिढीने घ्यावा, असे ते म्हणाले. नगराध्यक्षावरील आरोपामुळे राजघराण्याचे नाव खराब होत असल्याचे सांगत त्यांनी याबाबत भान ठेवण्याचा सल्ला दिला.दरम्यान, आजगाव परिसरात प्रस्तावित मायनिंगविरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली असून आठ गावांच्या बैठकीनंतरही ड्रोन सर्व्हे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामसभेने विरोधाचे ठराव मंजूर केले असतानाही सर्वेक्षणाला परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संबंधित ड्रोनमध्ये कॅमेऱ्यांऐवजी सेन्सर बसवण्यात आले होते आणि जमिनीची ‘सोनोग्राफी’ सुरू असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.“हे केवळ सर्वेक्षण असल्याचे सांगितले जात आहे; मात्र खासगी कंपनीसाठी प्रशासन काम करत असल्याचा भास निर्माण होत आहे. प्रशासनाने लोकांसाठी काम करावे,” असे ते म्हणाले. वन्यजीव आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणारे प्रकल्प कोकणातच का आणले जातात, असा सवाल करत “असा एखादा प्रकल्प नागपूरलाही घेऊन जा,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.पर्यावरण रक्षणासाठी आवाज उठवणाऱ्यांना ‘काळी मांजर’ म्हटले जात असल्याचा उल्लेख करत, “आम्ही ब्लॅक कॅट कमांडोंप्रमाणे पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी लढत आहोत,” असेही डॉ. परुळेकर यांनी सांगितले. अवैध मायनिंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे की यामध्ये हातमिळवणी आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.