भाजपकडून परप्रांतियांचे लाड कशासाठी?
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा सवाल
कणकवली / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर आजवर कोणत्याही पक्षाने परप्रांतियांची संघटनेची मोट बांधली नाही. मात्र, मते जोडणीसाठी भाजपकडून परप्रांतीय संघटना बांधण्यात येत आहे. भविष्यात निवडणुकात अपयश येऊ नये, म्हणून अशा संघटना बांधून, त्यांचे लाड करून भाजप नेमकं काय सिद्ध करू पाहत आहे? याच परप्रांतियांनी आतापर्यंत जिल्हावासीयांचे रोजगार हिरावलेत गरिबीचा फायदा घेत अनेक मुलींना पळवून नेले, अत्याचार केले आहेत. अशा घटनांमध्ये अजून वाढ व्हावी, असे भाजपला वाटते का? पोलिसांनीही अशा परप्रांतियांच्या नोंदी ठेवल्याच पाहिजेत. याबाबत मनसे आवाज उठविणारच आहे. मात्र, सर्वपक्षियांनी व नागरिकांनीही आवाज उठविण्याची वेळ आली आहे. अन्यथा भविष्यात येथील सरपंच उत्तर भारतीय असतील व आपण उपरे असू असा इशारा आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना उपरकर म्हणाले, भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्हयातील परप्रांतियांची संघटना नुकतीच स्थापन झाली. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे वा अन्य कोणत्याही पक्षाने परप्रांतियांची संघटना कधीही स्थापन केली नाही. आज हेच परप्रांतीय अनेक गुन्हयांत असल्याचे सिद्ध होत आहे किंवा दिसत आहे. एटीएम फोडणे, चोरी, अमली पदार्थ, दहशतवाद अशा अनेक ठिकाणी हीच मंडळी दिसतात. मात्र, भाजप त्यांचीच संघटना स्थापन करते, तर दुसरीकडे येथील आमदार नीतेश राणे हे उत्तर भारतीयांचा गुन्हेगारीत समावेश असेल तर त्यांना सोडणार नाही, अशी भूमिका घेत आहेत, हे नेमके काय आहे?
याच परप्रांतियांकडून आतापर्यंत येथील अनेक व्यवसायांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. आज अनेक व्यवसाय त्यांच्या ताब्यात असल्याने येथील तरुण बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. तरुण व्यसनाधीन होत आहेत. हे व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढविण्याचे काम भाजप करत आहे का? भाजप अशी परप्रांतियांची संघटना बांधून मतांच्या बेरजा करणार असेल तर जिल्हयातील लोकांनी त्याला एकत्र येत उत्तर देण्याची गरज आहे, असेही उपरकर म्हणाले.