तेली - केसरकरांकडे मायनिंग प्रकल्पाविरोधात उभे राहण्याचे धाडस आहे का?
डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा सवाल
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकीची दावेदारी मांडणाऱ्या महायुतीच्याच दोन पक्षातील शिलेदारांकडे आजगाव मायनिंग प्रकल्पाविरोधात ठामपणे उभं राहण्याचे धाडस आहे का?असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे . ते म्हणतात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागायच्या अगोदरच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुती मधील मित्र पक्षांमध्ये धुमशान सुरू झालेलं आहे. एकमेकांच्या हकालपट्टीची भाषा करण्यात येत आहे.पण मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखाची दोघांपैकी कोणालाही काळजी नाही. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्या बद्दल कोणालाही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही.आजगाव, धाकोरे ,आरवली ,शिरोडा सह मळेवाड पर्यंत एकंदर ९ महसूली गावांमधील २१०० एकर जमिनीवर जिंदाल कंपनीच्या मायनिंग प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. स्थानिक जनतेला हा महाकाय राक्षसी प्रकल्प अजिबात नको आहे. सर्व गावांनी तसे ग्रामसभेचे ठराव करून शासनाला पाठवलेले आहेत.पण तरीही ड्रोनच्या सहाय्याने जबरदस्तीने सर्वे केले जात आहेत. महायुती सरकारचा सदर मायनिंग प्रकल्पाला पाठिंबा आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकीची दावेदारी मांडणाऱ्या महायुतीच्याच दोन पक्षातील शिलेदारांकडे सदर मायनिंग प्रकल्पाविरोधात ठामपणे उभं राहण्याचे धाडस आहे का? हा खरा प्रश्न आज जनतेमध्ये आहे.