सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन
मुंबई : प्रतिनिधी
स्वतःच्या स्वतंत्र गायनशैलीने रसिकांच्या मनावर गेली आठ दशके अधिराज्य गाजवणा-या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी रविवारी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हिंदी, मराठी, बंगाली, तामिळ, गुजरातीसह विविध २० भाषांमध्ये जवळपास १२ हजार गाणी त्यांनी गायिली आहेत. शास्रीय, भावगीत, भक्तीगीत, फिल्मी, पाॕप, राॕक अशी विविध प्रकारची गाणी गाऊन त्यांनी आपले वेगळेपण वेळोवेळी सिद्ध केले. जुन्या काळातील अभिनेत्रींबरोबरच माधुरी, काजोलपर्यंत अनेक अभिनेत्रींसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. पडद्यावरील कलाकाराला आपला आवाज सूट झाला पाहिजे हे डोळ्यासमोर ठेऊन त्या पार्श्वगायन करायच्या. ही त्यांच्या पार्श्वगायनाची खासियत आणि लोकप्रियतेचे गमक होते. पर्पिया तू अब तो आजा, ये मेरा दिल यारका दिवाना, कतरा कतरा होती है, इन आँखोकी मस्तीके, याय रे याय रे जोर लगाके नाचो रे, ले गई ले गई, सांज ये गोकुळी अशी कितीतरी गाणी त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केली. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या.