बार्बीची झाली क्विन एलिझाबेथ डॉल
ब्रिटनच्या महाराणी क्विन एलिझाबेथ यांच्या सत्तारोहणाला यंदा सात दशकांचा कालावधी पूर्ण होत आहे. यानिमित्त त्यांना एक विशेष बार्बी बाहुली भेट देण्यात येणार आहे. बार्बी बाहुल्या तयार करणारी कंपनी ‘मेटल’ने महाराणींसाठी त्यांच्याच चेहऱयामोहऱयाची आणि वेशभूषेची बार्बी बनविली आहे. गुरुवारी 21 एप्रिलला महाराणी एलिझाबेथ यांचा 96 वा जन्मदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांना ही बाहुली भेट म्हणून देण्यात आली. महाराणींच्या सत्तारोहणाचा विशेष कार्यक्रम 2 ते 5 जून या कालावधीत साजरा केला जाणार आहे.
त्यांना भेट देण्यात आलेल्या बार्बीला पांढऱया रंगाचा गाऊन तसेच निळय़ा रंगाचा सॅश अशी वेशभूषा देण्यात आली आहे. या बार्बीला एक राजमुकुटही देण्यात आला असून तो एलिझाबेथ यांच्या विवाहादिवशी त्यांनी परिधान केला होता तसाच आहे. गेले तीन आठवडे महाराणी अनेक कार्यक्रमांमध्ये व्यग्र असल्याने जनतेला त्यांचे दर्शन झाले नव्हते. 29 मार्चला त्यांचे दिवंगत पती प्रिन्स फिलिप रिचर्ड यांच्या स्मारकाच्या समारोहप्रसंगी त्या जनतेला दिसल्या होत्या. त्यांचा वाढदिवस मात्र दणक्मयात साजरा करण्यात आला. त्यांना मानवंदना देण्यासाठी टॉवर ऑफ लंडन आणि हाईड पार्क येथे तोफांची सलामी देण्यात आली. 6 फेब्रुवारी 1952 या दिवशी महाराणी एलिझाबेथ यांचे पिता किंग जॉर्ज यांचे निधन झाले होते. तेव्हापासून त्यांनी ब्रिटनचा राज्य कारभार सांभाळला आहे. राणी किंवा राजघराण्याला ब्रिटनमध्ये केवळ नामधारी मानण्यात आले असले तरी जनतेच्या मनात मात्र आजही राजघराण्याबद्दल अतिआदराची भावना आहे.