For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सत्ताधार्‍यांत कुरघोड्या, विरोधकांत बेबनाव

06:40 AM Oct 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
सत्ताधार्‍यांत कुरघोड्या  विरोधकांत बेबनाव
Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात गेला आठवडाभर सत्ताधाऱ्यांमध्ये कुरघोड्या आणि विरोधकांमध्ये बेबनावाचे वातावरण आहे. या आठवड्यात सत्तेची गणिते, मित्रपक्षांतील कुरघोड्या, विरोधकांची इतर प्रश्नावर एकजूट आणि दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारची कसोटी अशा चार आघाड्यांवर घडामोडी घडल्या. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांतील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले. एमपीएससी आंदोलनातील यश अद्याप पचवण्यापूर्वी विरोधी पक्षांमध्ये अपचन सुरू झाल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांच्या या शक्तीचा विसर पडला की काय? अशी शंका घेण्यास वाव आहे.

Advertisement

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीने राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे. 23 ऑक्टोबरला होणाऱ्या पाच मतदारसंघांतील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यावरही युतीतील मतभेद पूर्णपणे मिटले नाहीत. पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी माघार घेतल्याने भाजपसोबतचा संभाव्य संघर्ष टळला असे दिसत असले तरी शिंदे सेनेचे एक उमेदवार अजूनही मैदानात आहेत. नागपूर आणि अमरावतीमध्ये बंडखोरांचे आव्हान कायम राहिले. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पदवीधर मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या विरोधी पक्षातील प्रमुख पक्षांनी परस्परांविरोधात उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीतील विसंवाद समोर आला. त्याचे लोण पुणे पदवीधर मतदार संघात देखील उमटले आणि ठाकरे सेनेने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ठाकरे पिता पुत्रांचा फोटो लावून प्रचार कराल तर गुन्हे दाखल करू इथपर्यंत इशारा दिला.

या घडामोडींचा अर्थ हा केवळ जागावाटपातील मतभेद एवढाच नाही. महायुतीत भाजपचा विस्तार आणि मित्रपक्षांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व यांच्यात संघर्ष दिसतो. शिंदे शिवसेना जशी अस्वस्थ आहे त्याचप्रमाणे अजित पवार राष्ट्रवादी देखील अस्वस्थ आहे. महाविकास आघाडीत भाजपविरोधी एकत्रित राजकारणाची भूमिका आणि स्थानिक पातळीवरील पक्षीय महत्त्वाकांक्षा यांचा मेळ बसत नसल्याचे स्पष्ट होते. निवडणुकीत मतदारांपर्यंत एकच संदेश पोहोचवण्याऐवजी मित्रपक्षच एकमेकांच्या मतांमध्ये वाटेकरी झाले, तर त्याचा फायदा तिसऱ्या उमेदवाराला होऊ शकतो.

Advertisement

ठाकरे बंधूंच्या आक्रमकतेची परीक्षा

मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा मुद्दा राज्यातील विरोधकांनी राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आणला आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज ठाकरे यांनी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याची मागणीही केली. मतदारयादीतील बदलांचा भाजपला फायदा होत असल्याचा विरोधकांचा आरोप निवडणूक आयोग व भाजपने नाकारला आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्रित भूमिकेमुळे मुंबईसह शहरी महाराष्ट्रात विरोधकांना एक व्यासपीठ मिळू शकते. मात्र, मोर्चातील गर्दीचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी बूथस्तरावरील संघटन, मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवरील ठोस भूमिका आवश्यक आहे. केवळ निवडणूक प्रक्रियेवरील आक्षेपांवर राजकारण केंद्रित केल्यास बेरोजगारी, महागाई, पायाभूत सुविधा व नागरी समस्यांवरील प्रश्न मागे पडण्याचा धोका आहे. दोन्ही ठाकरेंचे पक्ष आता बूथ लेवलला आपला पक्ष मजबूत करायचा प्रयत्न करत आहेत पण अनेक ठिकाणी उशीर झालेला दिसून येत आहे. आता संधीची वाट पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. ती संधी त्यांना युवकांच्या आंदोलनात दिसते आहे. ठाकरे बंधूंचे एकमेकांशी जमत असताना अलिकडे पवारांशी मात्र त्यांचे जमताना दिसत नाही.

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवे समीकरण?

छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा शिवसेनेने मागे घेतला. यामुळे विधान परिषद निवडणुकीतील पक्षीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. या निर्णयाकडे एका मतदारसंघातील स्थानिक राजकीय हालचाल म्हणून पाहणे अपुरे ठरेल. मित्रपक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय आणि तो मागे घेण्याची वेळ या दोन्ही बाबी पक्षांमधील समन्वयाचे स्वरूप स्पष्ट करतात. निवडणुकीपूर्वी जागावाटपाचा तिढा सोडवता न आल्यास निवडणुकीनंतर सत्तावाटप किंवा धोरणात्मक निर्णयांवरही त्याचे पडसाद उमटू शकतात.

दुष्काळाच्या निर्णयातून सरकारची कसोटी

या आठवड्यातील सर्वांत महत्त्वाची घडामोड म्हणजे राज्यातील दुष्काळाचा वाढलेला व्याप. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या 265 वरून 305 केली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची प्राथमिक मदत जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दुष्काळी सवलती, शैक्षणिक शुल्कमाफी आणि सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घालण्याबाबतही उपाययोजना जाहीर झाल्या. दुसरीकडे, बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना 15 दिवसांत सुरू करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. टँकर हा शेवटचा पर्याय ठेवण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह राज्यातील ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, पीकनुकसान आणि कर्जफेड हे प्रश्न थेट शेतकरी कुटुंबांच्या जगण्याशी जोडलेले आहेत. मदत वेळेत मिळाली नाही, तर सरकारच्या घोषणांचा राजकीय लाभ मर्यादित राहील. उलट, प्रभावी अंमलबजावणी झाली तर ग्रामीण मतदारांमधील विश्वास वाढू शकतो. गेल्या 8 दिवसांतील घडामोडींचा एकत्रित अर्थ स्पष्ट आहे. महायुतीसमोर मित्रपक्षांना सोबत ठेवण्याचे आव्हान आहे, तर महाविकास आघाडीसमोर अंतर्गत स्पर्धेवर मात करून विश्वासार्ह पर्याय उभा करण्याचे आव्हान आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त आंदोलनातून विरोधकांना राजकीय अवकाश मिळू शकतो; मात्र त्यासाठी व्यापक जनसंपर्क आणि निवडणुकीतील समन्वय आवश्यक आहे. 23 ऑक्टोबरच्या विधान परिषद निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षक मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे पहावे लागेल.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.