हंपीच्या संगीत मंडपातील खांबांना क्यू आर कोडची सोय
पर्यटकांना संगीताची धून ऐकण्याची संधी
बेळगाव : विजयनगरचे साम्राज्य म्हणून ओळखले जाणारे हंपी येथे पर्यटकांचा नेहमीच ओघ सुरू असतो. येथील प्राचीन शिल्पकला जगप्रसिद्ध आहे. हंपी येथील विजयविठ्ठल मंदिराच्या संगीत मंडपातील पाषाणाला स्पर्श केल्यास कानावर हळूवारपणे पडणारी संगीताची धून पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. संगीताची ही धून क्यू आर कोड स्कॅन करून ऐकण्याची संधी पर्यटकांना करून देण्यात आली आहे. संगीत मंडपातील दगडी खांबांना वारंवार स्पर्श केल्यास ते शिथिल बनण्याची शक्यता असते. त्यामुळे 2008 पासून संगीत मंडपात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, आता क्यू आर कोडद्वारे संगीत ऐकण्यास मिळणार असल्याने पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे. संगीत मंडपातील खांबांचे स्कॅन करून स्कॅनवरील खांबाला बोटाने स्पर्श केल्यास संगीताची धून कानावर पडणार आहे.
सध्या संगीत मंडपातील 10 खांबांना तळभागात पर्यटकांना मोबाईलद्वारे स्कॅन करण्यास सहजासहजी अनुकुल व्हावे यादृष्टीने क्यू आर कोडची सोय करण्यात आली आहे. पर्यटकांची मागणी वाढल्यास संगीत मंडपातील सर्व 46 खांबांच्या तळभागात क्यू आर कोडची सोय करण्यात येईल, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या हंपी विभागाने म्हटले आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर 25 सेकंदापर्यंत संगीताची धून कानावर येते. हंपी येथील दगडी खांबातून संगीताची धून ऐकू येणे हे एक आश्चर्य मानण्यात येत असून त्यामुळे येथे पर्यटकांचा नेहमी ओघ असतो. सर्वात अधिक पर्यटक भेट देणाऱ्या प्रेक्षणीय स्थळापैकी हंपी हे एक आहे.
खांबांचे जतन करण्याचे प्रयत्न
हंपी येथे मोठमोठ्या पाषाणात ताराप्रमाणे (वायर) कोरण्यात आले असून विजयनगर साम्राज्याच्या काळात या मंडपात संगीताची धून एकू येणारे 56 खांब होते. 1562 मध्ये तालिकोट युद्धात बहामनींच्या ताब्यात हंपीचा काही भाग आला. त्या काळात हंपीच्या संगीत मंडपातील 10 खांब विध्वंस झाले. या खांबांचे जतन करण्याचे प्रयत्न आता भारतीय पुरातत्व खात्याकडून सुरू आहेत.