सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेचा दवाखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये, यासाठी नगराध्यक्षांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. 5 ऑक्टोबरपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, दवाखान्यातील आरोग्य सेवा पूर्ववत सुरू होणार आहे.
नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांच्या मागणीपत्राच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह नगरपालिका दवाखान्याची पाहणी केली. येत्या चार दिवसांत डॉक्टरांसह आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.
सावंतवाडी येथे सध्या कार्यरत असलेले नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र नगरपालिका दवाखान्यातून चालविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून दवाखाना पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगरपालिका दवाखाना कायमस्वरूपी सुरू राहावा यासाठी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांच्यासह आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
पाहणीवेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सिद्धार्थ भांबुरे, देवेंद्र टेमकर यांच्यासह नगरपालिका अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
