समुद्रात पिरॅमिड, 10 हजार वर्षे जुने शहर
जपानच्या योनागुनि बेटाच्या परिसरात समुद्रात पिरॅमिडचे अवशेष मिळाले आहेत. येथे 10 हजार वर्षांपूर्वी एका शहराचे अस्तित्व होते, एखाद्या लुप्त झालेल्या संस्कृतीने हे शहर वसविले होते, याचेच अवशेष आता समुद्रात असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात पिरॅमिडसदृश एक इमारत देखील आहे. तर अन्य संरचना या महाल, मंदिर, मेहराब आणि स्टेडिअमशी साधर्म्य दर्शविणाऱ्या आहेत. या सर्व संरचना परस्परांशी रस्त्यांनी जोडल्या गेल्या होत्या असेही निदर्शनास आले आहे.
सागरी जीवतज्ञ मसाकी किमुरा यांनी सर्वात मोठी संरचना काहीशी जटिल पिरॅमिडप्रमाणे दिसते आणि ती 25 मीटर खोलवर असल्याचे सांगितले आहे. किमुरा मागील 15 वर्षांपासून या संरचनेचे मॅपिंग करत होते आणि दरवेळी जेव्हा ती ही संरचना पाहण्यासाठी पाण्यात उतरायचे तेव्हा हे एका प्राचीन शहराचा हिस्सा होते याबद्दलचा त्यांचा विश्वास दृढ व्हायचा. देशाती जोमोन लोकांकडून या शहराची स्थापना करण्यात आली असावी, हे लोक शिकार करायचे आणि ख्रिस्तपूर्व 12000 साली या बेटावर वास्तव्य करायचे, असे किमुरा यांचे मानणे आहे. परंतु प्रत्येकजण हा दावा खरा असल्याचे मानत नाही.
योनागुनी स्मारक कुठल्याहीप्रकारे मानवनिर्मित नसल्याचे वक्तव्य बोस्टन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक रॉबर्ट स्कोच यांनी केले आहे. तर पाण्यात आढळून आलेल्या संरचनांचा आकडा आता वाढत चालला आहे. या संरचना कशामुळे निर्माण झल्या याचे रहस्य अद्याप कायम आहे. 1986मध्ये एका स्थानिक पाणबुड्याने प्रथम पिरॅमिडसदृश हे ठिकाण पाहिले होते. तेव्हापासून याच्या निर्मितीबद्दल अनेक दावे केले जात आहेत.
1771 मध्ये एक त्सुनामी आली होती, याच्या लाटा सुमारे 40 मीटर उंच होत्या. या त्सुनामीने योनागुनी बेट आणि आसपासच्या क्षेत्राला प्र्रभावित केले, या आपत्तीमुळे 12 हजार लोक मारले गेले किंवा बेपत्ता झाले होते. दर 1500 ते 400 वर्षांमध्ये येथे तीव्र त्सुनामी येत असते, अशाप्रकारच्या आपत्तीने योनागुनी स्मारक बुडविल्याची शक्यता असल्याचे किमुरा यांनी सांगितले आहे.