पीव्ही सिंधूचे वर्षातील दुसरे अजिंक्यपद
वृत्तसंस्था, सारब्रुकेन (जर्मनी)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या रविवारी येथे झालेल्या सुपर-500 दर्जाच्या हायलो खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. 2026 च्या बॅडमिंटन हंगामातील तिचे हे दुसरे विजेतेपद आहे.
रविवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या 25 व्या मानांकित लिने केझरफेल्टचा 21-12, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. 5 लाख अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील सिंधू आणि डेन्मार्कची लिने यांच्यातील हा अंतिम सामना 39 मिनिटे चालला होता. या सामन्यात दोन्ही गेम्समध्ये सिंधूने आपले वर्चस्व निर्विवादपणे राखले होते. हायलो स्पर्धेत सिंधूला मानांकनात दुसरे स्थान मिळाले होते. सिंधूने आतापर्यंत लिनेवर सहा वेळा विजय मिळवला असून तिला एकदा लिनेकडून पराभव पत्करावा लागला होता. 2025 च्या सुदिरमन चषक फायनल्स स्पर्धैत लिनेने सिंधूला पराभूत केले होते.
या स्पर्धेमध्ये सिंधूने उपांत्य फेरीच्या सामन्यात आपल्या देशाच्या 53 व्या मानांकित अनमोल खर्बचा 21-13, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्याचप्रमाणे पुरुष एकेरीमध्ये भारताच्या लक्ष्य सेनने उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हचा 21-17, 21-13 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
