पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/ शेन्झेन, चीन
स्टार भारतीय शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी बुधवारी येथे चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत महिला आणि पुऊष एकेरीत उत्कृष्ट विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. फॉर्ममध्ये असलेल्या आणि जागतिक क्रमवारीत 36 व्या क्रमांकावर असलेल्या मालविका बनसोडने डेन्मार्कच्या 21 व्या क्रमांकावरील लाइन हॉजमार्क केयर्सफेल्डचा 20-22, 23-21, 21-16 असा पराभव करत दुस्रया फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असलेल्या दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला असून आपल्याहून वरच्या क्रमांकावरील बुसानन ओंगबामऊंगफानला 50 मिनिटांत 21-17, 21-19 असे नमविले. तिने थायलंडच्या या खेळाडूविरुद्धच्या आतापर्यंतच्या 21 लढतींतील 20 वा विजय मिळवला. हैदराबादच्या या 29 वर्षीय खेळाडूचा पुढील सामना सिंगापूरच्या येओ जिया मिनशी होईल, तर मालविकाची आठव्या मानांकित सुपनिदा कातेथोंगशी गाठ पडेल.
दरम्यान, लक्ष्यने आपल्या ऑलिम्पिक कांस्यपदक सामन्यातील पराभवाचा बदला 21-14, 13-21, 21-13 असा घेत सातव्या मानांकित मलेशियाच्या ली झी जियावर 57 मिनिटांत विजय मिळविला. लक्ष्यचा पुढील सामना डेन्मार्कच्या रासमुस गेमके किंवा जपानच्या केंटा निशिमोटोशी होईल. पॅरिस ऑलिम्पिकच्या कांस्यपदकासाठीच्या लढतीत लीकडून फायदेशीर स्थितीत असताना पराभूत व्हावे लागलेल्या लक्ष्यसाठी हा विजय खास होता.
त्या पराभवानंतरच्या लीविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात लक्ष्यने सूड उगवताना सुऊवातीच्या गेममध्ये 11-4 अशी आघाडी घेतली. लीने दिशाहीन फटकेबाजी केल्यावर भारतीय खेळाडूने आपली लय पकडली आणि सामना गुंडाळला.