पीव्ही सिंधू, अश्मिता चलिहा उपांत्यपूर्व फेरीत दाखल
वृत्तसंस्था /कौलालंपूर
येथे सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या भारताच्या पीव्ही सिंधूने कोरियन खेळाडूविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर अश्मिता चलिहाने सर्वात धक्कादायक निकाल नोंदवताना अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित बीवेन झँगचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असणाऱ्या सिंधूने कोरियाच्या सिम यु जिनचा 21-13, 12-21, 21-14 असा 59 मिनिटांच्या खेळात पराभव केला. जिन ही जागतिक क्रमवारीत 34 व्या स्थानावर असून सिंधूने तिला तिसऱ्यांदा हरविले आहे. गुडघ्याच्या दुखापतीनंतर या मोसमात पुनरागमन केल्यानंतर सिंधू फॉर्मसाठी झगताना दिसून आली आहे. येथे पाचवे मानांकन मिळालेल्या सिंधूची पुढील लढत अग्रमानांकित हान युईविरुद्ध होईल. युईने गेल्या महिन्यात आशियाई
बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधूला हरविले होते. त्याची परतफेड करण्याची संधी सिंधूला येथे मिळणार आहे. सिंधूने 2022 मध्ये सिंगापूर ही शेवटची स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिला एकही स्पर्धेत यश मिळालेले नाही. भारताच्या 24 वर्षीय अश्मिता चलिहाने अमेरिकेच्या बीवेन झँगवर 21-19, 16-21, 21-12 अशी मात करून सनसनाटी निर्माण करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. झँग ही जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहे. सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची चलिहाची ही दुसरी स्पर्धा आहे. 2022 मध्ये इंडिया ओपन स्पर्धेतही तिने या फेरीपर्यंत मजल मारली होती. तिची पुढील लढत सहाव्या मानांकित चीनच्या झँग यि मानविरुद्ध होईल. अन्य सामन्यात किरण जॉर्जला पाचव्या मानांकित ली झी जियाकडून संघर्षपूर्ण लढतीत 13-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रकुल कांस्य विजेत्या त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनाही महिला दुहेरीत कोरियाच्या सुंग शुओ युन व यु चिएन हुइ यांच्याकडून 18-21, 22-20, 14-21 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीची जोडी बी. सुमीत रे•ाr व एन. सिक्की रे•ाr यांनाही पराभवाचा धक्का बसल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्यांना मलेशियाच्या अग्रमानांकित चेन टँग जी व तोह ई वेई यांनी 21-9, 21-15 असे नमवित आगेकूच केली. तसेच सिमरन सिंघी व रितिका ठाकर यांनाही मलेशियाच्या द्वितीय मानांकित जोडीकडून पराभव पत्करावा लागला.