इलियाना डिक्रूजला पुत्ररत्न
बॉलिवूड अभिनेत्री इलियना डिक्रूज दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने स्वत:च्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. तसेच तिने स्वत:च्या नवजाताची झलक दाखविली असून त्याचे नावही सांगितले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे. इलियानाने 1 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्या मुलाला जन्म दिला होता, त्याचे नाव कोआ फीनिक्स डोलन ठेवण्यात आले होते. इलियानाने मागील काही काळापासून बॉलिवूडपासून अंतर राखले आहे. अभिनेत्रीने आता 19 जून रोजी दुसऱ्या पुत्राला जन्म दिला आहे. तसेच या पुत्राचे छायाचित्र तिने शेअर केले आहे. या मुलाचे नाव तिने कीनू राफे डोलन ठेवले आहे. प्रियांका चोप्रा, अथिया शेट्टी, विद्या बालन, मलाइका अरोरा, करणवीर शर्मा, शोफी चौधरी, रिद्धिमा तिवारी, डब्बू मलिक, अंजना सुखानी, जहीर इक्बाल समवेत अनेक कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे. इलियानाने 2023 मध्ये मायकल डोलनसोबत विवाह केला होता आणि त्याचवर्षी ती आई झाली होती. इलियाना यापूर्वी ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात तिच्यासोबत विद्या बालन आणि प्रतीक गांधी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.