For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियात ‘पुतीन’शाही कायम

06:45 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशियात ‘पुतीन’शाही कायम
Advertisement

राष्ट्रपती निवडणुकीत मोठा विजय निश्चित : मतदान प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

रशियात ब्लादिमीर पुतीन हे पुन्हा एकदा राष्ट्रपती होण्याची पार्श्वभूमी तयार झाली आहे. यामुळे पुतीन यांचा कार्यकाळ आणखी 6 वर्षांनी वाढणार आहे. रशियात केवळ नावापुरते मतदान झाले आहे. तीन दिवसांपर्यंत चालणारे मतदान शुक्रवारी सुरू झाले आणि अत्यंत नियंत्रित वातावरणात रविवारी संपुष्टात आले आहे. या निवडणुकीदरम्यान युक्रेनवरील आक्रमणासाठी पुतीन यांच्यावर टीका करण्याची अनुमती मतदारांना नव्हती. तसेच पुतीन यांचे विरोधक एलेक्सी नवाल्नी यांचा मागील महिन्यात तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर पुतीन यांचे अन्य विरोध एक तर तुरुंगात आहेत किंवा अज्ञातवासात.

Advertisement

71 वर्षीय पुतीन यांच्या विरोधात तीन उमेदवार या निवडणुकीत होते, परंतु हे तिघेही डमी उमेदवार मानले गेले, कारण तिघेही क्रेमलिनचे निकटवर्तीय आहेत. तसेच या उमेदवारांना देखील रशियाच्या राष्ट्रपतींचा 24 वर्षांचा कार्यकाळ किंवा युक्रेनवरील हल्ल्याबद्दल टीका करण्याची अनुमती नव्हती. युक्रेन युद्धात रशिया आघाडीवर असल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे. परंतु रविवारी सकाळीच रशियात झालेल्या युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांमुळे मॉस्कोतील स्थिती सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले. या ड्रोन हल्ल्यांमुळे कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

विरोधी पक्षांचे आवाहन

पुतीन यांच्यावर नाराज असलेल्या लोकांनी विरोधाच्या स्वरुपात दुपारी मतदान केंद्रांवर पोहोचावे असे आवाहन विरोधी पक्षांनी लोकांना केले होते. ही रणनीति नवाल्नी यांच्या सहकाऱ्यांनी तयार केली होती आणि विविध मतदान केंद्रांनजीक लोकांच्या गर्दीची छायाचित्रे आणि व्हिडिओ जारी करत ही रणनीति यशस्वी ठरल्याचा दावा नवाल्नी यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. रशियात प्रशासनाचे कठोर नियंत्रण असूनही अनेक मतदान केंद्रांवर तोडफोड झाली आहे. सेंट पीटर्सबर्गमध्ये एका महिलेला मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर फायरबॉम्ब फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर देशभरात अनेक लोकांनी मतपेटींमध्sय हिरवे अँटीसेप्टिक किंवा शाई फेकत पुतीन यांचा शासनाचा निषेध नोंदविला आहे.

Advertisement
Tags :

.