रशियातील निवडणुकीत पुतीन यांचा पक्ष यशस्वी
मिळविल्या 355 जागा, विरोधकांचा उडाला धुव्वा
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध भडकलेले असताना रशियाच्या संसदेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ‘युनायटेड रशिया’ पक्षाला प्रचंड यश मिळाले आहे. रशियाची संसद ‘डुमा’ या नावाने ओळखली जाते. या डुमाच्या एकंदर 450 जागांपैकी 355 जागा पुतीन यांच्या पक्षाने जिंकल्या आहेत. तर विरोधी पक्षांना केवळ 95 जागांवर समाधान मानावे लागलेले आहे.
गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस रशियाच्या विविध भागांमध्ये या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी रात्री उशीरापर्यंत मतगणना केली जात होती. मात्र, तेव्हापर्यंतच्या मतगणनेत पुतीन यांच्या समर्थक पक्षाला निर्णायक विजय मिळालेला होता. पुन्हा एकदा पुतीन यांच्याच पक्षाची सरशी झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले. रशियाच्या जवळपास सर्व प्रांतांमध्ये पुतीन यांच्या पक्षाने यश मिळविले आहे. त्यामुळे पुतीन यांचे राजकीय सामर्थ्य वाढलेले आहे.
95 टक्के मतगणना पूर्ण
भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री उशीरापर्यंत चाललेल्या मतगणनेत पुतीन यांच्या युनायटेड रशिया पक्षाला 355 जागांवर विजय मिळालेला होता. तोवेळपर्यंत एकंदर 95 टक्के मतांची गणना पूर्ण झाली होती. 2003 पासून रशियात याच पक्षाला विजय मिळालेला आहे. त्यामुळे गेली 23 वर्षे या पक्षाचे रशियाच्या संसदेत बहुमत आहे. तथापि, हे बहुमत औपचारिक आहे. कारण रशियाच्या प्रशासनाचे बहुतेक सर्व अधिकार व्लादिमीर पुतीन यांच्या हातीच एकवटले आहेत. 2036 पर्यंत पुतीनच रशियाच्या अध्यक्षपदी राहणार आहेत. कारण, तसा प्रस्ताव संमत झालेला आहे. त्यामुळे संसदेत बहुमत कोणाचेही असले, तरी रशियाच्या अध्यक्षांचे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मात्र, सांसदीय निवडणुकीत तीन चतुर्थांशापेक्षा अधिक बहुमत मिळाल्यामुळे त्यांना मोठे नैतिक बळ मिळाले आहे.
विक्रमी विजय
2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुतीन यांच्या पक्षाला मिळालेला विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे. 2003 पासून आतापर्यंत त्यांच्या पक्षाला कोणत्याही निवडणुकीत इतके यश मिळालेले नसल्याने हा विजय त्यांच्यासाठी विशेष आहे. रशिया युद्धमान स्थितीत असताना, तो मिळालेला असल्याचे रशियाची जनता पुतीन यांच्या धोरणाचे समर्थन करते, हे दिसते, असे तज्ञांचे मत आहे.