For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुतीन यांचा भारत दौरा निश्चित

06:17 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
पुतीन यांचा भारत दौरा निश्चित
Advertisement

4 डिसेंबरला आगमन, दोन दिवस अनेक कार्यक्रम

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला असून त्यांचे 4 डिसेंबरला भारतात आगमन होणार आहे. हा दौरा दोन दिवसांचा असून त्यात दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची विविध विषयांवर व्यापक चर्चा होणार आहे. ते 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखरपरिषदेच्या निमित्ताने येत आहेत.

Advertisement

त्यांच्या भारत दौऱ्याची अधिकृत घोषणा भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने शुक्रवारी केली आहे. या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्या परस्पर संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच दोन्ही देशांमधील विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनेही विचार केला जाणार आहे. दोन्ही देशांच्या दृष्टीने स्वारस्यपूर्ण असणाऱ्या विभागीय आणि जागतिक घटनांवरही दोन्ही देश चर्चा करणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र विभागाकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रपती देणार शाही भोजन

व्लादिमीर पुतीन यांचा हा केल्या चार वर्षांमधील दुसरा भारत दौरा असेल. 6 डिसेंबर 2021 या दिवशी ते भारतात आले होते. त्यांच्या या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्यापक चर्चा करणारच आहेत. तसेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्यासाठी विशेष शाही भोजन कार्यक्रमही निर्धारित केला आहे. 5 डिसेंबरला त्यांचे निर्गमन होणार आहे.

युद्धावर चर्चा होणार का...

24 फेब्रुवारी 2022 या दिवशी रशिया आणि त्याचा शेजारी देश युक्रेन यांच्यात युद्धाचा प्रारंभ झाला होता. या युद्धाला येत्या तीन महिन्यांमध्ये चार वर्षें पूर्ण होत आहेत. अद्यापही हे युद्ध होतच आहे. या युद्धासंबंधी भारत आणि रशिया यांच्यात पुतीन यांच्या या भारत दौऱ्यात चर्चा होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हे युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यांनी यासाठी नवी योजना पुढे केली आहे. भारतानेही हे युद्ध थांबावे, अशी इच्छा अनेकदा घोषित केली आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा होणार का आणि झालीच तर कशा प्रकारची असेल, या विषयी केवळ या दोन देशांमध्येच नव्हे, तर जगातही कुतुहल आहे.

अमेरिकेचा वाढीव कर

भारत रशियाकडून कच्चे इंधन तेल मोठ्या प्रमाणात घेत असल्याने अमेरिकेने भारतातून होणाऱ्या आयातीवर 50 टक्के व्यापार शुल्क लागू केले आहे. तसेच अमेरिकेने रशियाच्या महत्वाच्या तेल कंपन्यांवरही कठोर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे भारताने रशियाकडून घेतल्या जाणाऱ्या तेलात मोठी कपात केली आहे. या विषयावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा होणे शक्य आहे, अशी अनधिकृत माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महत्वाचे करार अपेक्षित

व्लादिमीर पुतीन यांच्या या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यात सामरिक महत्वाच्या दृष्टीने काही करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रशियाच्या मिग एसयु 57 या पाचव्या पिढीतील सर्वात आधुनिक युद्ध विमानांची निर्मिती भारतात करण्याचा मुद्दाही महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात या मुद्द्यासंबंधात करार होणार का हा औत्सुक्याचा विषय आहे. त्याचप्रमाणे, इतर संरक्षण सामग्री खरेदीच्या दृष्टीने काही करार होण्याची शक्यता आहे. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान आदानप्रदान या संबंधीही चर्चा आणि करार होतील, अशी शक्यता आहे. तथापि, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या संबंधीचे चित्र या दौऱ्याचा प्रारंभ झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे दिसून येत आहे.

भारतासाठी महत्वाचा दौरा

ड सध्याच्या जागतिक परिस्थितीत पुतीन यांचा हा दौरा भारतासाठी महत्वाचा

ड संरक्षण सामग्री खरेदी, अत्याधुनिक युद्धविमान, गुंतवणूक करार होणे शक्य

ड रशिया-युक्रेन युद्ध, तेलावरचे निर्बंध इत्यादी विषयांवर चर्चेसंबंधी उत्सुकता

ड 2021 नंतर रशियाच्या अध्यक्षांचा हा दुसरा भारत दौरा, दोन दिवस होणार

Advertisement
Tags :

.