सैन्य गणवेशात पुतीन यांचा कुर्स्क दौरा
युक्रेनच्या सैन्याला पिटाळून लावण्याचा दिला आदेश : युक्रेनच्या सैनिकांना दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक द्या
वृत्तसंस्था/मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या कुर्स्क प्रांताचा दौरा केला आहे. यादरम्यान पुतीन हे सैन्याच्या गणवेशात दिसून आले. पुतीन हे सीमेवरील सैन्याच्या एका कमांड पोस्टवर पोहोचले, यावेळी कुर्स्कच्या बहुतांश भागातून युक्रेनच्या सैन्याला हुसकावून लावण्यात आल्याबद्दल पुतीन यांनी आनंद व्यक्त केला. रशियाचे राष्ट्रपती कार्यालय क्रेमलिनने पुतीन यांच्या या दौऱ्याची छायाचित्रे जारी केली आहेत. हिरव्या रंगाचा गणवेश परिधान केलेले पुतीन हे यात वरिष्ठ सैन्य अधिकारी जनरल वालेरी गेरासिमोव्ह यांच्यासोबत दिसून आले. कुर्स्क प्रांतावर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात युक्रेनने हल्ला केला होता. अद्याप कुर्स्कच्या अनेक भागांवर युक्रेनच्या सैन्याचा कब्जा आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की या भूभागाचा वापर शस्त्रसंधी वाटाघाटीत रशियासोबत अदला-बदलीसाठी करू इच्छित आहेत.
युक्रेन शस्त्रसंधीसाठी तयार
पुतीन यांचा हा दौरा सौदी अरेबियात अमेरिका आणि युक्रेन यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर झाला आहे. या बैठकीत युक्रेनने 30 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती दर्शविली आहे. अमेरिका आता शस्त्रसंधीची ही योजना रशियासमोर मांडणार आहे. तर रशियाने यापूर्वीच कुठल्याही प्रकारच्या तात्पुरत्या शस्त्रसंधीस नकार दिला आहे. कुठल्याही तात्पुरत्या शस्त्रसंधीमुळे युक्रेनच्या सैन्यालाच लाभ होणार आहे. युद्धभूमीत पिछाडीवर पडलेल्या युक्रेनच्या सैन्याला स्वत:च्या सैनिकांची संख्या वाढविणे आणि तयारी करण्यास यामुळे मदत मिळणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
व्यापक सुरक्षा करार
रशियाने पाश्चिमात्य देशांकडून एका व्यापक सुरक्षा कराराची मागणी केली आहे. यात युक्रेनला नाटोत सामील न करण्याची हमी सामील आहे. आम्हाला शस्त्रसंधीची नव्हे तर शांततेची आवश्यकता आहे. रशिया आणि त्याच्या नागरिकांना सुरक्षा हमीसोबत शांतता हवी, असे पुतीन यांनी डिसेंबर महिन्यात म्हटले होते.
रशियाच्या 74 गावांवर युक्रेनचा कब्जा
युक्रेनच्या सैन्याने ऑगस्ट महिन्यात रशियाच्या कुर्स्क भागात 74 गावांवर कब्जा केला होता. युक्रेनच्या अचानक हल्ल्यानंतर दोन लाख रशियन नागरिकांना स्वत:चे घर सोडून जात अन्यत्र आश्रय घ्यावा लागला होता. युक्रेनने 6 ऑगस्ट रोजी रशियाच्या कुर्स्क भागावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. युक्रेनने 13 ऑगस्टपर्यंत 1 हजार चौरस किलोमीटरच्या भूभागावर कब्जा केला होता. यानंतर रशियाने प्रत्युत्तर देत कुर्स्कमध्ये युक्रेनच्या ताब्यातील 40 टक्के भाग परत मिळविला आणि येथे 59 हजार सैनिक तैनात केले आहेत.
20 टक्के भूभागावर रशियाचे नियंत्रण
युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने युक्रेनच्या सुमारे 20 टक्के भूभागावर कब्जा केला आहे. राष्ट्रपती पुतीन यांनी युक्रेनचे चार प्रांत डोनेट्स्क, लुहांस्क, जापोरिज्जिया आणि खेरसॉनला रशियात सामील केले आहे. तर रशियाच्या कुर्स्क भागात दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान संघर्ष सुरू आहे.
युक्रेनचे 400 सैनिक रशियाच्या ताब्यात
राष्ट्रपती पुतीन यांनी कुर्स्क भागात पकडण्यात आलेल्या युक्रेनच्या सैनिकांसोबत रशियाच्या कायद्याच्या अंतर्गत दहशतवाद्यांसारखी वागणूक केली जावी आणि त्यांच्याविरोधात खटला चालविला जावा, असे सांगितले आहे. जनरल गेरासिमोव्ह यांनी कुर्स्क येथील मोहिमेत 400 हून अधिक युक्रेनियन सैनिकांना पकडण्यात आल्याचा दावा केला आहे. भाडोत्री विदेशी सैनिक जिनिव्हा कराराच्या श्रेणीत येत नाहीत. रशियाच्या विरोधातील युद्धात युक्रेनच्या वतीने विदेशी सैनिक देखील लढत आहेत असा आरोप पुतीन यांनी केला आहे. चालू महिन्यात रशियाने कुर्स्क येथे युक्रेनच्या वतीने लढत असलेल्या एका 22 वर्षीय ब्रिटिश युवकाला ताब्यात घेतले होते. या युवकाला दहशतवादाच्या आरोपाखाली 19 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.