पुतीन स्नेहभोजन : शशी थरुर समाधानी
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे केरळमधील खासदार शशी थरुर यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना राष्ट्रपतींनी दिलेल्या शाही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासंबंधी समाधान व्यक्त केले आहे. या कार्यक्रमांसाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यात थरुर यांचाही समावेश होता. कार्यक्रम झाल्यानंतर थरुर यांनी त्याची काही छायाचित्रे सोशल मिडियावर पोस्ट केली आहेत. हा कार्यक्रम आणि त्यात झालेली चर्चा अत्यंत उत्साहवर्धक होती, अशी प्रशंसा त्यांनी केली आहे.
या कार्यक्रमातील वातावरण अत्यंत खेळीमेळीचे आणि मित्रत्वाचे होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक मान्यवरांशी माझी अत्यंत स्नेहयुक्त वातावरणात चर्चा झाली. अनेक विषयांवर आम्ही मतांचे आदानप्रदान केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमात केलेले भाषण भारत आणि रशिया यांच्या घनिष्ट मैत्रीला अधिक दृढ करणारे होते. या कार्यक्रमात भारत आणि रशिया यांच्या शिष्टमंडळांचे सदस्य एकत्रच हालचाली करीत होते. हास्यविनोदांच्या पार्श्वभूमीवर आणि तणावमुक्त वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. तो एक अविस्मरणीय सोहळा होता, असे मत थरुर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये व्यक्त केले.
दौरा फलदायी
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारताचा दौरा फलदायी ठरला, अशी प्रतिक्रिया दोन्ही देशांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या दौऱ्यात संरक्षणापासून संस्कृतीपर्यंत अनेक विषयांवर महत्वपूर्ण करार करण्यात आले. भारताला कच्च्या इंधन तेलाचा पुरवठा अखंड होत राहील, हे महत्वाचे आश्वासन पुतीन यांनी दिल्याने भारतालाही मोठा दिलासा मिळाला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा झाल्याने त्याला मोठे महत्व प्राप्त झाले होते. अध्यक्ष पुतीन यांनीही भारताने आमंत्रित केल्याने त्याचे आभार मानले आहेत. भारत आणि रशिया यांच्यात गेल्या सात दशकांपासून निकटचे सहकार्य आहे. भारताची संरक्षणव्यवस्था पुष्कळ प्रमाणात रशियाच्या सहकार्यावर अवलंबून आहे. भारत आपल्या आवश्यकतेपैकी किमान 40 टक्के शस्त्रास्त्रे रशियाकडून विकत घेतो. त्यामुळे भारतासाठी तो अत्यंत महत्वाचा देश आहे