पुतीन यांचे मोदींना रशिया दौऱ्याचे निमंत्रण
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी घेतली भेट : युक्रेन युद्धावर चर्चा
वृत्तसंस्था/मॉस्को
रशियाच्या दौऱ्यावर असलेले विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धासमवेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. तर राष्ट्रपती पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढील वर्षी रशियाच्या दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. आमचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियात पाहून आम्हाला आनंद होईल. जगात मोठी उलथापालथ सुरू असतानाही रशिया आणि भारताचे संबंध मजबूत होत आहेत. युव्रेन युद्धाच्या स्थितीसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा माहिती दिली आहे. या संकटावर शांततापूर्ण तोडगा काढण्यात यावी अशी मोदींची इच्छा आहे. मोदींसोबत या मुद्द्यावर चर्चा करण्याची माझी इच्छा आहे. परंतु कुठल्याही स्थितीत रशिया आणि भारताचे संबंध स्थिर राहणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. जयशंकर हे यापूर्वी रशियातील भारताचे राजदूत देखील राहिले आहेत. पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय मुद्दे, भारत-रशिया संबंध, व्यापार आणि युक्रेनच्या मुद्द्यावरील भारताच्या भूमिकेवर चर्चा केली आहे. दोन्ही देशांमधील व्यापार केवळ कच्चे तेल, कोळसा आणि ऊर्जेशी संबंधित उत्पादनांपुरती मर्यादित राहू नये यावर रशियाने भर दिला आहे. जगात सुरू असलेल्या अशांततेदरम्यान आशियामध्ये आमचा मित्र भारत आणि तेथील लोकांसोबतचे संबंध वृद्धींगत होत असल्याचे सांगताना आम्हाला आनंद होतोय असे पुतीन म्हणाले.
रशियाकडून समर्थन
जयशंकर यांनी बुधवारी रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेत द्विपक्षीय चर्चा केली होती. यादरम्यान लावरोव्ह यांनी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व देण्याच्या मुद्द्यावर समर्थन दर्शविले आहे. भारताने जी-20 चे अध्यक्षत्व करत स्वत:च्या विदेश धोरणाचे सामर्थ्य सिद्ध केले असल्याचे लावरोव्ह म्हणाले.