राजकारण बाजुला करून कुस्तीसाठी एकत्र या
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांचे तालमींना आवाहन
मोतिबागमधील नव्या इमारतीचे उद्घाटन, बाळ गायकवाड यांच्या पुतळ्याचे अनावरण, आमदार क्षीरसागरांकडून ‘मोतिबाग’ला 20 लाख रुपयांचा निधी जाहीर
कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराजांचा वरदरस्त लाभलेल्या कोल्हापूरी कुस्तीची वैभवशाली परपंरा आहे. मल्लांनीही हिंमतीने महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीच्या गदा जिंकल्या आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले. अशा सगळ्या परंपरेला नाहक राजकारण मागे खेचत आहे. त्याचा फटका मल्लांचा फटका बसतो आहे. त्यामुळे सर्वांनी राजकारण बाजूला करुन एकत्र तर यावेच. शिवाय महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीची गदा जिंकणारे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणारे मल्ल घडवावेत, असे आवाहन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी रविवारी येथे केले.
मोतिबाग तालमीमध्ये मल्लांसाठी लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या नावाने बांधलेल्या दोन मजली इमारतीचे उद्घाटन व तालमीमध्ये उभारलेल्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सर्वेसर्वा (कै.) बाळ गायकवाड यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात ते बालत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश क्षीरसागर व माजी खासदार संजय मंडलिक हे होते. यावेळी खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन व बाळ गायकवाड यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यानंतर मोतिबाग तालमीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅट हॉलमध्ये मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले. मोतिबाग तालीमच्या माध्यमातून कुस्ती वाढीबरोबरच गदा जिंकणारे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडवण्यात बाळ गायकवाड यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे, असे सांगून शाहू छत्रपती म्हणाले, जुन्या काळात स्वस्ताई होती. त्यावेळी मल्लांना खुराक परवडत होता. सध्याच्या महागाईच्या काळात मात्र खुराकावर खर्च करणे कठिण जात आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने मल्लांना मदतीचा हात देणे जरुरीचे आहे. लाडकी बहिण योजना जशी काढली तशी लाडका मल्ल योजना सुरु करावी. कुस्तीतील जाणकारांनीही महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीच्या धर्तीवर कुस्ती मैदान भरवून महाराष्ट्र व बाहेरील मल्लांमध्ये लढती लावाव्यात. असे केल्याने झाकोळलेले कुस्ती वैभव पुन्हा उभारी घेईल.
आमदार क्षीरसागर म्हणाले, तालमींच्या विकासासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून शाहूविजयी गंगावेश तालीम व शाहूपुरी तालीमसाठी कोटी ऊपयांच्या घरात निधी मंजूर केला आहे. सांस्कृतिक संचालनालयाकडूनही शाहू खासबाग मैदानाच्या विकासासाठी 10 कोटी रुपये निधी वर्ग झाला आहे. लवकरच मोतिबाग तालीमच्या विकासासाठीही 20 लाख रुपये दिले जातील. आगामी काळातील आठवण म्हणून मोतिबाग तालीमने बाळ गायकवाड यांच्या स्मरणार्थ कुस्ती मैदान भरवावे. लागेल ते सहकार्य केले जाईल.
माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले की, बाळ गायकवाड यांनी पुनाळ (ता. पन्हाळा) गावातून कोल्हापूरात येऊन वाढवलेल्या कुस्तीत वाईट पद्धतीचे राजकारण घुसले आहे. मल्लांचे हित पाहून या राजकारणला बाजूला करत कुस्तीचे शुद्धिकरण हे करावेच लागेल. हे करताना मोठमोठ्या गदा जिंकण्यालायक मल्ल घडवण्यावरही लक्ष द्यावे लागेल. एक माझी जबाबदारी म्हणून लवकरच मुरगुडमध्ये विशेष बैठक बोलावून कुस्ती विकासाबाबत ठोस पाऊले उचललण्याची तयारी केली आहे.
महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर म्हणाले की, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीचा दावेदार तुमच्याकडे कोण आहे, असे आम्हाला बाहेरचे लोक विचार असतात. त्यांना दावेदारीचा मल्ल आहे की नाही हे सागंताना आम्हाला लाज वाटते. हे खेदजनक चित्र बदलायचे असेल तर मल्लांनीची कंबर कसून दावेदारी सिद्ध करावी लागेल. शासनानेही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मल्लांना नोकऱ्या देतानाच दर्जेदार मल्लांना खुराकासाठी मानधन देऊन त्यांच्या कुटुंबीचा आर्थिक भार हलका करावा. यावेळी हिंदकेसरी विनोद चौगले, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, माजी नगरसेवक अदिल फरास, क्रीडा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळ पाटणकर, उपमहाराष्ट्र केसरी गोरख कनकाटे-पाटील, संभाजी वऊटे, पी. जी. मेढे आदी उपस्थित होते.
तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी स्वागत केले. जनरल सेक्रेटरी अॅङ महादेवराव आडगुळे यांनी प्रास्ताविक केले. अशोकर पोवार यांनी आभार मानले. हिंदकेसरी दिनानाथसिंह यांनी आभार मानले.
मंत्र्यांनी मल्लांचे आरोग्य चांगले करावे...
खासदार शाहू छत्रपती यांनी भाषणात एक मार्मिक विधान केले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या संपूर्ण आरोग्याची जबाबदारी आरोग्य मंत्री पदाच्या ऊपाने कोल्हापूर जिह्यातील मंत्र्याकडे आली आहे. याचा जास्तीत जास्त फायदा तालमी व मल्लांनी करून घेतला पाहिजे. शिवाय मंत्र्यांनीही पुढाकार घेऊन जिह्यातील मल्लांना झुकते देत त्यांचे आरोग्य चांगले करण्याला प्राधान्य द्यावे.