केजरीवाल विरोधात ‘पूर्वांचल सन्मान’ रॅली
भाजपकडून केजरीवालांच्या टिप्पणीचा निषेध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत पूर्वांचली लोकांवरून अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधार्थ भाजपने निदर्शने केली आहेत. खासदार मनोज तिवारी यांच्या नेतृत्वात भाजपने पूर्वांचल सन्मान मोर्चा काढला आहे. हा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग करत पाण्याचा मारा केला आहे. तसेच अनेक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भाजपकडून अशोक रोड ते केजरीवालांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पूर्वांचल सन्मान मार्च’ देण्यात आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या हातात बॅनर तसेच पोस्टर्स होती.
अरविंद केजरीवालांनी गुरुवारी पक्षाच्या काही नेत्यांसोबत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना केजरीवाल यांनी युपी-बिहार आणि आसपासच्या राज्यांमधून लोकांना आणत बनावट मतदार करण्याचे काम केले जात असल्याचा दावा केला होता. 15 डिसेंबर ते 8 जानेवारीपर्यंत 13 हजार नव्या मतदारांसाठी अर्ज करण्यात आले होते. दिल्ली विधानसभा मतदारसंघात 1 लाख मतदार असताना 13 हजार नवे लोक कुठून आले असा प्रश्न केजरीवालांनी उपस्थित केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावरून भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे.
भाजप आता ‘धरना पार्टी’ ठरली आहे. मी स्वत:च्या घराबाहेर भाजपसाठी तंबू ठोकणार आहे, यामुळे भाजपला स्वत:च्या मर्जीनुसार बॅनर बदलता येणार आहेत. भाजप हा अत्यंत दुटप्पीपणा करणारा पक्ष आहे. भाजप रोहिंग्यांचे कारण देत दिल्लीत पूर्वांचली लोकांची नावे मतदार यादीतून वगळत असल्याने मी निवडणूक आयुक्तांना भेटलो होतो. परंतु माझ्यावर आता खोटे आरोप केले जात आहेत. आम आदमी पक्षानेच पूर्वांचली पार्श्वभूमी असलेल्या लोकांना अधिक संख्येत उमेदवारी दिली आहे, असा दावा केजरीवालांनी शुक्रवारी केला आहे.