गणेशतत्व जाणून घेण्यासाठी पूर्वकर्माची पुण्याई लागते
अध्याय सहावा
बाप्पा म्हणाले, मायेचे जड आणि चेतन असे दोन प्रकार आहेत. माया ही ईश्वराची शक्ती असून ती ईश्वराच्या इच्छेनुसार काम करते. हे सर्व जग ईश्वराच्या मर्जीनुसार चालतं. कुणाच्या नजरेला न दिसता अदृश्यपणे ईश्वर दिसणारे जग सांभाळत आहे. जड मायेच्या माध्यमातून ईश्वरी लिलेच्या स्वरूपात जग दिसत असते आणि परा मायेच्या स्वरूपातून त्यात चैतन्य निर्माण होते. माया ईश्वराच्या आधीन असल्याने माणसाची कर्मे ईश्वराच्या आधीन असतात. पुढील श्लोकात बाप्पा सांगतात की, बहुतेक लोक वरवरच्या दिसणाऱ्या जगात रममाण होतात पण ही सर्व लीला घडवणाऱ्या लिलाधराचा शोध घ्यावा असं फार क्वचित कुणाला वाटतं.
तत्त्वमेतन्निबोद्धुं मे यतते कश्चिदेव हि ।
वर्णाश्रमवतां पुंसां पुरा चीर्णेन कर्मणा ।। 7 ।।
अर्थ- वर्णाश्रमधर्माचे पालन करणाऱ्या माणसांपैकी एखादाच त्याने पूर्वी केलेल्या कर्मामुळे हे माझे तत्त्व जाणण्याचा प्रयत्न करतो.
विवरण- मनुष्याची प्रवृत्तीच अशी असते की ती भोगात सुख मानते. ते क्षणिक सुख त्याला हवेहवेसे वाटत असल्याने त्याला त्याची अत्यंत ओढ असते. मग भले त्यामुळे दु:ख भोगावे लागले तरी त्याला त्याची तयारी असते. त्याचा त्याग करून ईश्वरी तत्व जाणून घेण्याची इच्छा होणे ही फार अप्राप्य गोष्ट आहे. त्याला तसंच जबरदस्त पूर्वकर्माचं पुण्य गाठी असावं लागतं. त्यासाठी आवश्यक तो पुण्यसाठा जो वर्णाश्रम धर्माप्रमाणे वागत आला असेल त्याच्याकडेच असतो. तसं बघितलं तर ईश्वराने आपल्याला दिलेला मनुष्यजन्म हा कर्तव्यपूर्ती करण्यासाठी दिलेला आहे. त्यासाठी माणसाच्या आयुष्याचे चार वर्ण ईश्वराने निर्माण केलेले आहेत. त्या त्या वर्णानुसार प्रत्येकाला कर्तव्ये नेमून दिलेली आहेत. त्या कर्तव्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव ईश्वर कधीच मानत नाहीत. भगवद्गीतेमधील अठराव्या अध्यायात ह्या कर्तव्यांचा स्पष्ट उल्लेख श्रीकृष्णांनी केलेला आहे तो खालीलप्रमाणे.
शांती क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह । ऋजुता आणि पावित्र्य ब्रह्म-कर्म स्वभावता ।। 42 ।। शौर्य दैर्य प्रजा-रक्षा युद्धी हि अ-पलायन । दातृत्व दक्षता तेज क्षात्र-कर्म स्वभावता ।। 43।। शेती व्यापार गो-रक्षा वैश्य-कर्म स्वभावता । करणे पडिली सेवा शूद्र-कर्म स्वभावता ।। 44 ।। आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी । ऐक लाभे कसा मोक्ष स्व-कर्मी लक्ष लावुनी ।। 45।। जो प्रेरी भूत-मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे । स्व-कर्म-कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो ।। 46।।
यातील सेहेचाळीसाव्या श्लोकात जो याप्रमाणे नेमून दिलेली कर्तव्ये चोख पार पाडेल त्याला मोक्ष मिळेल असे भगवंतांचे वचन आहे. ह्याप्रमाणे स्वकर्म कुसुमांनी जो ईश्वराचे पूजन करेल त्याच्या पदरी खूप मोठा पुण्यासाठा असल्याने त्याला आणि केवळ त्यालाच ईश्वराबद्दल अधिक जाणून घ्यावं अशी इच्छा होते. अर्थात अशाप्रकारे ईश्वरांच्या आदेशाप्रमाणे कर्म करणारा लाखात एखादाच असल्याने लाखात एखाद्यालाच गणेशतत्व म्हणजे ईश्वराचे तत्व जाणून घ्यावे अशी इच्छा होते. ज्याला अशी इच्छा होते त्याला ईश्वर स्वत:हून मार्ग दाखवतात.
क्रमश: