For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

भक्ताचे शारीरिक कर्म स्वत: पुरुषोत्तम करत असतो

06:28 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
भक्ताचे शारीरिक कर्म स्वत  पुरुषोत्तम करत असतो

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, परमेश्वराने जरी नाना अवतार धारण केले असले तरी श्रीरामकृष्णचरित्र व त्यातील सर्वच प्रसंग सोन्यासारखे परमपवित्र आहेत. श्रीकृष्णाच्या दह्यादुधाच्याचोरीचे वर्णन केले असता, मन पवित्र होते. कृष्णाच्या व्याभिचारांचे वर्णन केले असता व्याभिचारातून निर्माण होणारे दोष नाहीसे होतात. श्रीकृष्णाने पुतनेचे दुध पिले ह्या प्रसंगाचे वर्णन केले असता श्रद्धाळूंचे सुरापानादि दारुण दोष नाहीसे होतात. रावण जरी ब्राह्मण असला तरी त्याच्या पापाचा घडा भरल्याने श्रीरामांनी त्याचा वध केला. हा ब्राह्मणवध नितीन्यायाला धरून असल्याने हे कथानक जो सांगेल किंवा ऐकेल त्याचे ब्रम्हत्येचे पाप नाहीसे होईल.

धर्मसाह्यकारी श्रीकृष्णाने पांडवांचे रक्षण केले ह्या महाभारतातल्या कथेचे श्रवण केले असता मृत ब्राह्मण उठून बसतात. श्रीरामकृष्णकीर्ती ऐकणाऱ्यांची महापातके नष्ट होतात, त्याही पुढचे सांगायचे म्हणजे त्यांच्या पायाला चारही मुक्ती वंदन करतात. त्या संपत्तीच्या बळावर देहात असताना त्यांना सहजी सायुज्यता प्राप्त होते. त्यामुळे जिवंतपणीच ते कृष्णरूप होतात. हरीकीर्तिकीर्तनाची गोडी लागून जो त्यात अत्यंत व्यस्त असतो तो देहाची कर्तव्ये निभावत असतो पण प्रत्यक्षात त्याचे मन हरीत गुंतलेले असते आणि हरीचे वास्तव्य त्याच्याच हृदयात असते.

Advertisement

थोडक्यात ते दोघे एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत. अशा पद्धतीने हरीभक्त संसारी नांदत असतात. म्हणून जेव्हा जेव्हा भगवंत अवतार घेतात तेव्हा तेव्हा हरीभक्तांचा त्यांच्याभोवती वेढा पडलेला असतो. त्यातही एखादा हरीचा अत्यंत लाडका असतो. हरीला त्याचा इतका मोह पडतो की, अवतार समाप्तीच्यावेळी त्याला सोडून जावे लागणार ह्या कल्पनेने लाडक्या भक्ताचा विरह हरीला सहन होत नसतो. मागे आपण बघितले की, श्रीकृष्णाला उद्धवाचा विरह सहन होण्यासारखा नव्हता किंवा गीता ऐकताना अर्जुनाची एव्हढी समाधी लागली की तो हरीशी एकरूप झाला परंतु अर्जुन एकरूप झाल्यावर हरीने पुन्हा त्याला भानावर आणले कारण अर्जुन जर त्यांच्यात मिसळून गेला तर ते कुणाशी बोलणार असा त्यांना प्रश्न पडला होता. हरीला आपला विरह सहन होऊ नये इतके हरीच्या मनात भरण्यासाठी हरीकीर्तनासारखे सहजसोपे साधन नाही. जे हरीची कीर्ती सर्वदूर पोहोचवण्यात यशस्वी होतात त्यांना देहबंधनाचा जाच होत नाही. ते निभावत असलेल्या कर्तव्यकर्मातून त्यांना कोणतीच अपेक्षा नसल्याने त्यांच्या खात्यावर त्यातून पुण्य जमा होत नाही.

Advertisement

कृष्णाच्या कीर्तनाने त्यांची स्थिती उजळते, ती इतकी उजळते की, ती कल्पांतापर्यंत मळू शकत नाही. ज्याप्रमाणे पाऊस पडल्याने आकाश ओले होत नाही किंवा सूर्यबिंबाचे प्रतिबिंब गढूळ पाण्यात पडल्याने सूर्यबिंब मळू शकत नाही त्याप्रमाणे कृष्णकीर्तन करणाऱ्याने देहकर्मे केली तरी त्याची उजळलेली स्थिती आहे तशीच राहते. हरीकीर्तिकीर्तनाचा कल्लोळ केल्यामुळे ज्याची निष्कामदशा उजळलेली असते. त्याचा देह त्याने कर्मे केली तरी विटाळला जात नाही. त्यांनी हरीच्या अत्यंत जवळचे स्थान प्राप्त केलेले असल्याने त्यांना स्वत:चे असे काही कर्म उरलेले नसते. त्यातून त्यांचे जे काही शरीराने करायचे कर्तव्य कर्म असेल ते स्वत: पुरुषोत्तम करत असतो. त्यामुळे त्यांच्या देहाच्या हालचाली पुरुषोत्तम स्वत:च घडवून आणत असल्याने आपण करत असलेले कर्म चांगले आहे की वाईट आहे ह्याचे त्यांना भानही नसते. त्यामुळे त्यांच्या अलिप्तस्थितीला कसलीही बाधा म्हणून येत नाही.

ह्याउलट अभक्तांची स्थिती असते. ते करत असलेल्या प्रत्येक कर्मातून त्यांच्या खात्यावर पाप किंवा पुण्य जमा होत असते.

क्रमश:

Advertisement
Tags :
×

.