कोल्हापूरात आयसोलेशन परिसरात आढळला ‘पर्पल पेंक ट्रम्पेट’ वृक्ष
कोल्हापूर प्रतिनिधी
विविध वृक्षांचा अभ्यास करताना वनस्पतीतज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर आणि वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांना कोल्हापूर शहरातील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात जांभळट- गुलाबी रंगाच्या फुलांनी बहरलेला, मध्यम उंचीचा, आकर्षक वृक्ष आढळून आला. डॉ. बाचूळकर यांनी हा वृक्ष पूर्वी कर्नाटक राज्यातील बेळगांव व बेंगळूर शहरातील बागांमध्ये पाहिला होता, यामुळे त्यांना या वृक्षाची ओळख लगेच पटली. पर्पल- पिंक ट्रम्पेट असल्याचे स्पष्ट झाले.
कोल्हापूर शहरातील कांही खासगी बागांमध्येही हे आकर्षक वृक्ष दिसून आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पतीकोषात पर्पल-पिंक ट्रम्पेट वृक्षाची शास्त्राrय नोंद नाही. आता ही रितसर नोंद करीत आहेत, अशी माहिती डॉ. बाचूळकरांनी दिली.
पर्पल-पिंक ट्रम्पेट वृक्षाचे शास्त्राrय नाव हॅन्ड्रोअॅन्यस इम्पेटी जिनोअस असे असून, हा वृक्ष बिग्नोनिएसी म्हणजेच, टेटूच्या कुळातील आहे. हा वृक्ष विदेशी असून, याचे मुळ स्थान दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात आहे. या खंडातील बहुतांश देशांत हे वृक्ष नैसर्गिकपणे वनक्षेत्रात आढळतात. या वृक्षाला पॅराग्वे या देशाचा राष्ट्रवृक्ष म्हणून बहुमान मिळाला आहे. या वृक्षांची अनेक देशांत बागांमध्ये लागवड केलेली आहे.पर्पल-पिंक ट्रम्पेट हा पर्णझडी वृक्ष उते 10 मीटर उंच वाढतो. हे वृक्ष काहीवेळा 25 मीटर उंचीपर्यंत वाढतात. फांद्या अनेक, पसरण्राया असून, पाने संयुक्त हस्ताकृती व समोरासमोर असतात. प्रत्येक पानांत पर्णिकांची संख्या पाच असून, त्या लंबगोलाकार असतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पानगळ होऊन डिसेंबर-जानेवारीमध्ये फुलांचा बहार येतो.
वृक्ष जांभळट - गुलाबी रंगांच्या फुलांनी बहरतो. यावेळी वृक्ष अत्यंत सुंदर, आकर्षक व मनमोहक दिसतात. फुलांमध्ये पाकळ्या पाच, एकमेकास चिकटलेल्या असून, तुतारीच्या आकाराचे पुष्पनळी तयार होते. पुष्पनळीचे मुख पिवळसर असते. फलधारणा आपल्याकडे अगदी क्वचित दिसून येते. छाटकलम पद्धतीने रोपे तयार करता येतात. या वृक्षाला प्रचलित मराठी नाव नाही, पण या वृक्षास आपण जांभळट-गुलाबी तुतारी म्हणू शकतो. उष्ण कोरड्या हवामानात हे वृक्ष उत्तम वाढतात, अशी माहिती डॉ. बाचूककरांनी दिली