For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमधील पूर्णिया विमानतळाचे उद्घाटन

06:45 AM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
बिहारमधील पूर्णिया विमानतळाचे उद्घाटन
Advertisement

पंतप्रधानांकडून बिहारसाठी 36 हजार कोटींच्या प्रकल्पांची भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ पूर्णिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बिहारमधील पूर्णिया येथे पोहोचले. येथे त्यांनी नवीन नागरी एन्क्लेव्हच्या तात्पुरत्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. या नवीन टर्मिनलमुळे विमानतळाच्या सुविधा आणि क्षमता वाढेल आणि परिसराच्या विकास आणि इंटरकनेक्टिव्हिटीमध्ये मदत होईल. पूर्णिया विमानतळ बिहारचे चौथे व्यावसायिक विमानतळ बनले आहे. या विमानतळाच्या उद्घाटनाचा फायदा प्रामुख्याने सीमांचल प्रदेशातील लोकांना होईल. त्याशिवाय जवळच्या जिह्यांतील लोकांना हवाई सेवेचा लाभ मिळेल. पूर्णिया व्यतिरिक्त अररिया, कटिहार, किशनगंज, मधेपुरा, सहरसा आणि सुपौल यांना थेट फायदा होईल.

Advertisement

पूर्णिया विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री विजय सिन्हा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू हे देखील पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी शीशाबरी एसएसबी ग्राउंड येथे 36,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी येथील सार्वजनिक सभेलाही संबोधित केले. पूर्णिया विमानतळ संकुल टर्मिनल इमारत, एप्रन, कार्गो कॉम्प्लेक्स, एसटीपी, पाणी आणि अग्निशमन टँक, इलेक्ट्रिक सब स्टेशन, एव्हिएशन फ्युएल फार्म, अॅडमिन ऑफिस, कमर्शियल प्लाझा आणि स्टिल्ट पार्किंग यासारख्या सुविधांनी सुसज्ज आहे. पाटणा, गया आणि दरभंगानंतर पूर्णिया हे बिहारचे चौथे विमानतळ बनले आहे. येथून आता लोक देशाच्या इतर भागात विमानाने जाऊ शकतील. सध्या पूर्णिया विमानतळावरून कोलकाता आणि अहमदाबादला थेट विमानसेवा उपलब्ध आहे. इंडिगो एअरलाइन्सची कोलकाताला जाणारी विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध असेल.

निवडणूक आयोग येत्या काही आठवड्यात बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा जाहीर करू शकते. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राजकीय पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. रॅली आणि जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. निवडणूक आश्वासने देखील जाहीर केली जात आहेत.

Advertisement
Tags :

.