For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूर्णब्रह्माचीच हत्या मी मुर्खाने बाण मारून केली

06:30 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
पूर्णब्रह्माचीच हत्या मी मुर्खाने बाण मारून केली
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

कृष्णावताराच्या समाप्तीचे वर्णन करताना नाथमहाराज म्हणाले, स्वत:च्या कुलाची होळी करून सरस्वतीच्या किनारी वनमाळी पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. श्रीकृष्णाचे लालसर चरण बघून जराव्याधाला ते हरणाचे तोंड आहे असे वाटले. ही मोठ्ठीच शिकार आपल्याला मिळाली ह्या विचाराने त्याने धनुष्याला प्रत्यंचा लावून बाण मारला आणि त्या बाणानेच श्रीकृष्णाच्या तळपायाचा वेध घेतला गेला. भगवंतांनी अवतार घेताना यादव वंशाची निवड केलेली असल्याने त्यांनाही यादवांना मिळालेला ब्रह्मशाप भोवला. जराव्याधाचा बाण कृष्णाच्या तळपायातून आरपार गेला तरी कृष्ण दचकला नाही. उलट बाण आरपार गेल्याचे पाहून त्याला बरेच वाटले. सुसाटत गेलेला बाण लक्षावर बरोबर लागला आहे हे जराव्याधाने ओळखले. आपण मोठे हरीण मारले आहे असे वाटून तो त्याला धरायला धावला. तेथे जाऊन तेथील दृश्य पाहिल्यावर मात्र तो भयचकित झाला. त्याला दिसले की, हे कोणी हरीण नसून चार हात असलेला एक पुरुष बसलेला आहे. ते पाहून तो अतिशय घाबरला. आपण परमपित्या श्रीकृष्णालाच बाण मारला आहे हे त्याच्या लक्षात आले. हे कृत्य करून आपण महापापाच्या राशी रचल्या आहेत असे त्याला वाटू लागले. त्याला अत्यंत दु:ख झाले त्या दु:खाच्या भरात तो म्हणाला किती दुष्ट कर्म मी केले आहे. मी महापापी आहे. ह्या दु:खद कर्मातून माझे निवारण कोण करणार? अखिल जगाचा परमात्मा असलेल्या श्रीहरीला मी बाण मारला. असे अघोर पाप अन्य कोणते नसेल. भीतीने त्याचे शरीर थरथर कापू लागले. ज्याचे सर्व जग ध्यान करते त्याला मी ताप दिला. ज्याच्या चरणांना अमर झालेले सत्पुरुष वंदन करतात, ज्याला संत लोटांगण घालतात त्या श्रीकृष्णाला मी बाण मारला, असे पूर्णपणे पापाचरण माझ्या हातून झाले. चुकून जरी आत्महत्या केली तरी त्याचे पाप कोणत्याही कारणाने नाहीसे होत नाही. येथे तर जगाचा आत्मा असलेल्या श्रीकृष्णाची हत्या माझ्या हातून झाली आणि ते पाप माझ्या शिरावर चढले. अशाप्रकारे जगाची आत्महत्या व्हायला मी कारणीभूत झालो. ह्या पापाचे परिमार्जन कोणत्याही पुण्य कृत्याने होणे शक्य नाही. चुकून जरी ब्रह्महत्या घडली तर त्या पापाला क्षमा नसते. येथे तर पूर्णब्रह्माचीच हत्या मी मुर्खाने बाण मारून केली. असे नाना प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊ लागले. आपल्या हातून घनघोर पाप घडले असून त्या पापाला क्षमा नाही हे जराव्याधाला कळून चुकले. जो जगाचा ताप नाहीसा करतो त्या चित्स्वरूप परमात्म्याला मी संताप दिला हा विचार त्याला चैन पडू देईना. तो तसाच धावत धावत गेला आणि त्याने श्रीकृष्ण चरणी लोटांगण घातले. दैत्यांच्या अभिमानाचे मर्दन करणाऱ्या मधुसूदनाचे चरण त्याने घट्ट पकडले आणि तो धाय मोकलून रडू लागला. श्रीकृष्णाने त्याला उठवायचा खूपवेळा प्रयत्न केला पण काही केल्या कृष्णाच्या पायांना मारलेली मिठी सोडायला तो तयार होईना. सकल सृष्टीवर कृपा करणाऱ्या, श्रीकृष्णाने त्याच्यावर एक कृपादृष्टी टाकून त्याला क्षमा करावी असे त्याचे एकच मागणे होते. अत्यंत भयभीत झालेला जराव्याध श्रीकृष्णाला म्हणाला, मी पापात्मा असून अतिअशुद्ध आहे. नकळत माझ्या हातून तुम्हाला बाण मारण्याचा अपराध घडला. जो ईश्वराच्या मूर्तीचा उच्छेद करतो तो महापापी लिंगभेदी असतो. ईश्वरस्वरूप असलेल्या तुम्हाला मी दुर्बुद्धीने बाणाने घायाळ केले. असा मी पापी पापकर्मा, महापापी पापात्मा आहे. पुरुषोत्तमा कृपाळुवा हा माझा अपराध पोटात घेऊन मला क्षमा करा. तुमचा कृपाळूपणा त्रिजगतात प्रसिद्ध आहे. कित्येकांवर तुम्ही कैकवेळा कृपा केली आहे.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.