परमार्थात चित्तशुद्धी होण्याला फार महत्त्व आहे
अध्याय सातवा
जे भक्त समाधीसाधन करून मोक्षमार्गाची वाटचाल करत असतात ते मृत्यूनंतर सूर्यमार्गाने जाऊन ब्रह्मलोकी कायमचा वास करतात पण ज्या भक्तांना अशाप्रकारे साधना करणे शक्य होत नाही ते मृत्यूनंतर चंद्रमार्गाने जाऊन कालांतराने पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात. मृत्यूपश्चात सूर्यमार्गाने जाऊन ब्रह्मप्राप्ती करून घेता यावी अशी इच्छा आहे परंतु समाधी मार्गाची विशेष आवड नाही अशा भक्तांसाठी बाप्पांनी षोडशोपचारे पूजेचा मार्ग सांगितला आहे. त्यानुसार जो रोज त्यांची षोडशोपचारे पूजा करून भक्तिभावाने त्याला जे शक्य असेल ते बाप्पांना अर्पण करतो त्याला मृत्यूनंतर सूर्यमार्गाने पुढे जाऊन ब्रह्मप्राप्ती होऊ शकते. बाप्पांना काय अर्पण केले ह्यापेक्षा जे आपल्याला शक्य आहे ते अर्पण करण्याचा भाव महत्त्वाचा आहे. कारण माणसाच्या स्वभावाचा कल सहसा दुसऱ्याला काही देण्यापेक्षा दुसऱ्याचे आपले कसे होईल हे बघण्याकडे असतो. बाप्पांचा भक्त मात्र आनंदाने त्याच्याकडील वस्तू बाप्पांना अर्पण करण्यास खुशीने तयार होतो कारण त्याला हे माहित असते की, इशावास्योपनिषदात सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे असलेल्या सर्व वस्तू ह्या ईश्वराच्या असून त्या त्याने काही काळ आपल्याला वापरायला दिलेल्या आहेत. त्यानुसार बाप्पांनी दिलेल्या वस्तू त्यांना अर्पण करायची संधी मिळाली ह्याबद्दल आनंदित होऊन तो बाप्पाना नैवेद्य दाखवतो. हे झाले प्रत्यक्ष पूजेचे वर्णन.
षोडशोपचार पूजा रोज करायची म्हंटलं तर त्यासाठी वेळही खूप लागतो आणि अनेक साधने जमवावी लागतात. त्यामुळे आपण रोज बाप्पांची षोडशोपचार पूजा करावी असं कितीही मनात असलं तरी काही भक्तांना त्यांच्या परिस्थितीनुसार षोडशोपचारे पूजा करण्यासाठी आवश्यक तो वेळ, साधनांची उपलब्धता किंवा त्यासाठी लागणारे धन आदि गोष्टी मिळवणे शक्य नसते. अशा भक्ताचा भक्तिभाव, त्यांचे बाप्पांच्यावर असलेले प्रेम ह्या गोष्टी बाप्पांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्याने अगदी साध्या साध्या वस्तू जसे की, पान, फुल, फळ अगदी पाणीसुद्धा बाप्पाना अत्यंत भक्तिभावाने अर्पण केले तरी त्याचा भक्तिभाव पाहून बाप्पा त्याच्यावर प्रसन्न होतात. पण ज्यांना वरीलपैकी कोणतेही साहित्य जमवणे शक्य नसते त्यांनी मानसपूजा करावी असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
अथवा मानसीं पूजां कुर्वीत स्थिरचेतसा । अथवा फलपत्राद्यैऽ पुष्पमूलजलादिभिऽ । पूजयेन्मां प्रयत्नेन तत्तदिष्टं फलं लभेत् ।। 9 ।। त्रिविधास्वपि पूजासु श्रेयसी मानसी मता । साप्युत्तमा मता पूजानिच्छया या कृता मम ।। 10।।
अर्थ-जो स्थिर चित्ताने मानस पूजा करतो अथवा फल, पत्र, पुष्प, मूल, उदक इत्यादिकांनी माझी पूजा करतो त्याला इष्ट फल प्राप्त होते. तिन्ही प्रकारच्या पूजांमध्ये मानसपूजा श्रेष्ठ मानली आहे. इच्छारहित होऊन जे मला कोणत्याही प्रकारे पूजतात ती उत्तम पूजा होय.
विवरण-परमार्थसाधनेमध्ये चित्तशुद्धी होण्याला फार महत्त्व आहे. ज्याच्या मनात वाईट विचार यायचे बंद होतात त्याचे चित्त शुद्ध झाले असे म्हणता येईल. त्यासाठी योगसाधना हा मुख्य उपाय आहे. मात्र सर्वांना तो शक्य नसल्याने त्यांच्या चित्तशुद्धीसाठी बाप्पांची पूजा रोज करणे हा उत्तम उपाय आहे. त्यांनी नित्यनेमाने ईश्वराची पूजा बाप्पांच्या सगुण मूर्तीच्या रूपात करत रहावी. ज्यांना काही ना काही अडचणीमुळे षोडशोपचारे पूजा करणे शक्य नसेल त्यांनी मानसपूजा करावी. त्यामुळे सतत बाप्पांचेच विचार त्याच्या मनात रेंगाळत रहात असल्याने त्याच्या मनात वाईट विचार येत नाहीत.
क्रमश: