For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साधनेतील शुद्धता

06:31 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
साधनेतील शुद्धता
Advertisement

मार्कंडेय पुराणात श्रीरामांची कथा महर्षी व्यासांनी सांगितली आहे. श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई वनवासात असताना एका ठिकाणी लक्ष्मणाचे मन कलुषित झाले. लक्ष्मणाला वाटले की, ‘राजपुत्राचे, राजधानीचे, पत्नीचे सुख भोगायचे सोडून मी कां बरे भाऊ आणि वहिनीच्या मागे फिरतो आहे? या दोघांचे खरेच माझ्यावर प्रेम आहे का?’ श्रीराम अंतर्यामी असल्यामुळे त्यांनी ओळखले की लक्ष्मणाचे मन बिघडले आहे, तेव्हा ते म्हणाले, ‘लक्ष्मणा, येथील थोडी माती एका पुरचुंडीत बांधून ती जवळ ठेव बरे.’ लक्ष्मणाजवळ ती माती जेव्हा जेव्हा असे तेव्हा त्याच्या मनात मोठ्या भावाविषयी वाईट विचारांच्या लहरी उमटत. माती ठेवून दिली की पवित्र विचार येत. असे होण्याचे कारण श्रीरामांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘लक्ष्मणा, यात तुझा दोष नसून भूमीचा आहे. ही माती सुंद-उपसुंद या राक्षसांच्या वाईट मनोवृत्तीने दूषित झाली आहे. दोन सख्खे भाऊ इथे एका स्त्राrच्या अभिलाषेपोटी वैराने मेले आहेत. या अशुद्ध भूमीचा परिणाम तुझ्या मनावर झाला आहे. ‘पू. डोंगरे महाराज म्हणतात, ‘अशुद्ध भूमी भक्तीत बाधते. शुद्ध भूमी साधनेत साथ देते. म्हणून प्रापंचिक माणसाने निदान पंधरा दिवस तरी एखाद्या पवित्र स्थळी जाऊन नामसाधन करावे.’ तीर्थक्षेत्र हे सत्पुरुषांच्या भक्तीने पावन झाले असते म्हणून तिथे मनाच्या शक्तीचा विकास होतो. मनातील अद्भुत शक्ती जागवून मन शुद्ध करण्यासाठी संतांच्या गावी, स्थळी जावे.

Advertisement

शुद्ध भूमी मनात उच्च विचारांचे तरंग निर्माण करते. शुद्ध मन हे नेहमी निर्भय असते. जुन्या काळी लोकप्रिय असलेल्या एका गाण्याचे बोल असे आहेत-

‘मन सुद्ध तुझं गोष्ट आहे पृथविमोलाची,

Advertisement

तू चाल गड्या पुढं रं तुला भीती कुणाची?

परवा बी कुणाची?’

-प्राणीमित्रांचा अनुभव आहे की पशुपक्ष्यांना माणसांच्या मनातील विचारांचे परमाणू पन्नास फुटांवरून सहज कळतात. त्याप्रमाणे ते पवित्रा घेतात. माणूस घाबरला की बचावासाठी प्राणी आक्रमक होतात. हे ज्ञान प्राण्यांना निसर्गत: लाभते. भीतीच्या लहरी प्राण्यांपर्यंत पोहचल्या की ते माणसांवर हल्ला करतात. ज्यांच्या अंत:करणातून प्रेमाच्या लहरी प्रसृत होतात तिथे प्राण्यांना निर्भय वाटते आणि ते शेपटी हलवून आनंद व्यक्त करीत, जिभेने चाटून प्रेम व्यक्त करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात-

‘चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती

व्याघ्र हे न खाती सर्प तया’

-ऋषींच्या आश्रमात सगळे प्राणी आपआपले वैर विसरून एकत्र नांदले, कारण ऋषींचे मन निर्मळ व शुद्ध होते.  माणसाच्या मनात षड्रिपूंची भेसळ असते. त्याचे मन शुद्ध नसल्याने त्याला सहज परमात्म्याचा साक्षात्कार घडत नाही. संशयकल्लोळ हे एक महत्त्वाचे कारण त्यात असते. ज्यांच्या मनात फक्त परमेश्वर भरून उरतो तिथे ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हा अनुभव परमात्मा देतो. भक्तविजयसार या ग्रंथामध्ये गोमाई नावाच्या पांडुरंगभक्त गरीब स्त्राrची कथा आहे. गोमाई आषाढीवारीसाठी नित्य पंढरपूरला जात असे. एके वर्षी पंढरपूरला जाण्यासाठी तिला रस्ता सापडेना. कारण चंद्रभागेला महापूर आला होता. लोक होडीतून नदीपार दर्शनाला जात होते. गोमाईजवळ पैसे नसल्याने तिला होडीतून जाता येईना. संपूर्ण यात्रा पलीकडे गेली. ती एकटीच उरली. तिची व्याकुळता जेव्हा शिगेला पोहचली तेव्हा नावाड्याचे रूप घेऊन पांडुरंग प्रकटला. त्याने तिला नदीपलीकडे नेले. तिच्याजवळ असलेले पीठ ती त्याला वाढायला देऊ लागली तेव्हा तो म्हणाला, ‘द्वादशीच्या दिवशी याचे पानगे करून घालशील.’ विठोबा रखुमाईने मेहुणे म्हणून गोमाईच्या हातचे पानगे खाऊन पारणे सोडले. शुद्ध मनाचा हा महिमा आहे.

जगन्नाथपुरी येथील भक्तिपरायण संत स्त्राr कर्माबाईची खिचडी प्रसिद्ध आहे. सोवळे न पाळता शुद्ध मनाने ती प्रात:काळी जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य दाखवत असे. एकदा काही लोकांनी तिला हटकल्याने तिने विधीयुक्त स्नान करून स्वयंपाक केला, त्यामुळे नैवेद्याला उशीर झाला. देव तिच्या खिचडीची वाट बघत बसला. जगन्नाथाने सर्व भक्तांना सांगितले की कर्माबाईचे अंत:करण शुद्ध असल्याने तिला सोवळे पाळायची गरज नाही. अद्यापही कर्माबाईची खिचडी आल्याशिवाय दुसरा नैवेद्य जगन्नाथास दाखवत नाहीत. सात्विक शुद्ध अन्न सेवन केल्याने मन शुद्ध होते. अन्न तसे मन हा सिद्धांतच आहे. दूध, तूप, केळी हे सात्विक अन्न म्हणून सेवन केले तरी ते जर भ्रष्टाचार, काळ्या पैशाच्या बाजारातून विकत आणले असेल तर ते तामसी ठरते. साधकाने अन्नाबाबत फार जागरूक असावे लागते. स्वयंपाक करणाऱ्याची मानसिकता जर नामस्मरणयुक्त गुणसंपन्न असेल तर ते अन्न सेवन करण्याची इच्छा दृढ होते. परमेश्वराचे नाम घेत अन्न सेवन केले तरच ते शुद्ध भोजन ठरते.

संत एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे--

‘देह शुद्ध करूनी भजनी भजावे

आणिकांचे नाठवावे गुणदोष..’

-देह हे परमात्म्याचे घर आहे. नरदेहाची जेवढी दुर्लभता संतांनी वर्णन केली आहे तेवढेच त्याचे किळसवाणे वर्णनही केले आहे. कारण माणसाची देहबुद्धी सहसा नाहीशी होत नाही. देहामधल्या परमेश्वरापेक्षा अहंकाररूपी ‘मी’ प्रबळ असतो. त्यामुळे शेवटपर्यंत देह शुद्ध होत नाही. प्रायोपवेशन हे देह शुद्ध करण्याचे एक व्रत आहे. निराहार राहून मृत्यूला सामोरे जाणे असा याचा रूढ अर्थ असला तरी देहशुद्धी करण्याची ती प्रक्रिया आहे. राजा परीक्षिताने श्रीमद्भागवत कथा श्रवण करीत प्रायोपवेशन केले व देह शुद्ध करून भगवंताला अर्पण केला. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात--

‘स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे ।

पापात्मके पापे नरका जाईजे ।

मग ते माते जेणे पाविजे ।

ते शुद्ध पुण्य?’

-परमेश्वरच हवा असेल तर आणि जे भगवंतासाठीच केले असेल तर ते शुद्ध पुण्य आहे. असे शुद्ध पुण्य ही मोक्षाची वाट आहे.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.