अग्निहोत्र विधीने परिसर-वातावरण शुद्धी
सूर्याला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र : सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळी विधी आपल्या घरी करण्याची गरज
बेळगाव : कोणत्याही भेदाशिवाय कोणालाही करता येते अशी उपासना म्हणजे अग्निहोत्र उपासना होय. ही उपासना वातावरण शुद्धीसाठी, मनशांतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी उपासना आहे. पूर्वी ही उपासना नित्यनेमाने केली जात असे. मध्यंतरीच्या काळात ती हळुहळू मागे पडली. परंतु अग्निहोत्र साधकांनी केलेल्या प्रसारामुळे तिला पुन्हा वैभव प्राप्त होत आहे. मुख्य म्हणजे 12 मार्च हा अग्निहोत्र दिन असून याच दिवशी शिवपुरीमध्ये अग्निमंदिर प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. अग्निहोत्र म्हणजे नेमके काय? तर वातावरण शुद्धीसाठी अत्यंत कमी वेळेत, कमी खर्चात केला जाणारा एक यज्ञ होय. कोरोनाचा भयावह परिणाम आपण सर्वांनी अनुभवला. आजही आपल्या भोवतालचा परिसर अशुद्ध आहे. रोगांचे प्रमाण वाढले आहे. शुद्ध हवा मिळणे कठीण होत आहे. बाहेरच्या दूषित हवेचा आणि वातावरणाचा संपर्क आल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. या सर्वांवर उपाय म्हणून अग्निहोत्र हा विधी उपयुक्त ठरतो. वेदांमध्ये अग्नीला आणि अग्नी पूजेला महत्त्व दिले आहे. सूर्याला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र होय. हा विधी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी केला जातो. त्यासाठी अग्निहोत्र पात्र, शेणी, तूप, तांदूळ इतकेच साहित्य आवश्यक आहे. पात्रामध्ये शेणींना तूप लावून त्या पात्रामध्ये ठेवून त्यावर कापुराने त्या प्रज्वलित करायच्या व त्यामध्ये पळीने तुपाचे थेंब सोडून
सूर्याय स्वाहा: सूर्याय इदं न मम्।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम्
असा पहिला मंत्र म्हणायचा व त्यानंतर
अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम्।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम्।
असा मंत्र म्हणत दोन चिमूट तांदूळ पात्रामध्ये घालायचे, एवढाच अग्निहोत्र विधी आहे. अग्निहोत्रचे परिणाम पाहण्यासाठी पुण्याचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांनी गर्दीच्या ठिकाणी हा प्रयोग केला. अत्यंत प्रदूषित असा हा परिसर असूनही अग्निहोत्र केल्यानंतर तेथील सुक्ष्मजंतूंची वाढ 90 टक्के थांबली व हवेतील घातक सल्फरडायऑक्साईडचे प्रमाण 10 पटींनी कमी झाल्याचे आढळून आले. रोपांना याची राख घातल्यानंतर रोपांची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीसाठी आता अग्निहोत्र विधी उपयुक्त ठरू लागला आहे. याची राख जंतुनाशक असून जखमा, त्वचा यावर उपयुक्त ठरते. या राखेमुळे पिण्याच्या पाण्यातील जंतू आणि क्षाराचे प्रमाणही कमी झाले आहे. एकूणच हा विधी अत्यंत उपयुक्त असा आहे. प्रामुख्याने परिसर आणि वातावरण शुद्धीसाठी हा विधी प्रत्येकांनी आपल्या घरी करण्याची गरज आहे.