देहशुद्धी व न्यासक्रिया
अध्याय सातवा
जे बाप्पांची मनोभावे पूजा करतात त्यांना बाप्पा हवे ते देतात व त्यांची मनोकामना पूर्ण करतात.जे कोणतीही इच्छा अपेक्षा न ठेवता बाप्पांची पूजा करतात त्यांना बाप्पा स्वत:हून सिद्धी प्रदान करतात व त्यांच्याकडून लोककल्याणकारी कार्ये पूर्ण करून घेतात. मृत्यूनंतर त्यांची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून, स्वत:च्या लोकी स्थान देतात. जे बाप्पांना सोडून इतर देवतांची पूजा करतात त्यांचेही मनोरथ बाप्पा पुरवतात. जे बाप्पांचा आणि इतर दैवतांचा द्वेष करून यक्ष, राक्षस, भुते, खेते, प्रेते आदींची पूजा करून समाजाला लुबाडतात, त्रास देतात त्यांची मात्र रवानगी बाप्पा अनंत काळपर्यंत नरकात करतात.
वरील सर्व वाचून आपणही बाप्पांची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी असे सगळ्यांना वाटते पण त्यांची नक्की पूजा कशा पद्धतीने करावी, त्याबद्दल अधिकाराने कोण सांगू शकेल असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. अर्थात बाप्पा आपल्या मनातले जाणत असल्याने ते आपल्या मदतीला धावून येतात. पुढील श्लोकातून बाप्पा पूजाविधीबद्दल सविस्तर सांगत आहेत. बाप्पांनी सांगितलंय म्हंटल्यावर त्याबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका न घेता निर्धास्त होऊन आपण त्याप्रमाणे पूजा करून बाप्पांचे लाडके होऊ शकतो. पूजाविधीबद्दल बाप्पा म्हणाले,
भूतशुद्धिं विधायादौ प्राणानां स्थापनं ततऽ ।
आकृष्य चेतसो वृत्तिं ततो न्यासमुपक्रमेत् ।। 14 ।।
अर्थ- अगोदर भूतशुद्धि माती, उदक इत्यादिकांची शुद्ध करून नंतर प्राणांची शरीरांतील वायूंची स्थापना करावी.
अर्थ- पूजेच्या सुरवातीला पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आपलं शरीर स्नान करून शुद्ध करावं. नंतर प्राणायाम करून चित्त स्थिर करावे. त्यानंतर न्यास करावेत. न्यास म्हणजे काय हे पुढील श्लोकातून जाणून घेऊयात.
कृत्वान्तर्मातृकान्यासं बहिश्चाथ षडङ्गकम् ।
न्यासं च मूलमत्रस्य ततो ध्यात्वा जपेन्मनुम् ।।15 ।।
विवरण- पूजेच्या आधी देहशुद्धी करण्यासाठी स्नान करून पूजेला बसल्यावर प्राणायाम करून चित्त स्थिर करावे. त्यानंतर न्यास करावा असं बाप्पा सांगतात. न्यास म्हणजे काय व तो का करायचा हे समजून घेऊ. आपलं हे शरीर खरं म्हणजे ईश्वराच्या मालकीचं आहे आणि त्यानं ते आपल्या आत्म्याचा आपण उध्दार करून घ्यावा या कामासाठी आपल्याला वापरायला दिलेलं आहे. व्यवहारात आपण शक्यतो दुसऱ्याची वस्तू वापरत नाही. अगदीच नाईलाज झाला तर आणलेली दुसऱ्याची वस्तू काळजीपूर्वक वापरून काम झालं की, लगेच परत करतो पण देहाच्या बाबतीत मात्र आपण तसे करत नाही. ईश्वराने काही काळ वापरायला दिलेला देह आपण आपला समजतो. देहाच्या संबंधाने आप्त, स्वजन, धनदौलत, अन्य सुखोपभोग या सर्वाविषयी आपण ममत्वभाव बाळगतो पण हे चुकीचे असून अनर्थकारी आहे. तेव्हा हे ममत्व, देहाचा मोह व अनुषंगिक गोष्टींचा लोभ ज्या देहामुळे निर्माण होतो, तो खरं तर ईश्वराच्या मालकीचा आहे याची जाणीव व्हावी म्हणून शास्त्रात विविध न्यासक्रिया सांगितल्या आहेत. या न्यासक्रियेमध्ये देहाविषयी वाटणारे आपलेपण बाजूला करून, शरीराच्या प्रत्येक भागाच्या आत व बाहेर इष्टदेवतेची मंत्राने स्थापना करावयाची असते. त्यामुळे देह पवित्र होऊन त्याला पूजा करायचा अधिकार मिळतो. तसेच पूजा करत असताना मन अस्थिर होणे, ग्लानी किंवा सुस्ती येणे, भ्रम उत्पन्न होणे हे सर्व टाळण्यासाठी अशा न्यासांची आवश्यकता असते.
क्रमश: