‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात २ रुपये वाढ
म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ- सतेज पाटील
‘गोकुळ’च्या म्हैस दूध उत्पादकांना नवीन वर्षाची गोड भेट- अध्यक्ष डोंगळे
कोल्हापूर
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून गोकुळ संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. तरी दि.११/०१/२०२५ इ.रोजी पासून ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ. प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर २ रुपये दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय दि.१०/०१/२०२५ इ.रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.
यावेळी बोलताना अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. संघाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हैस दूध उत्पादकांसाठी दिलासा देणारी दर वाढ केली आहे. दूध उत्पादकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे. म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्यामुळे दूध उत्पादकांना नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय वाढण्यास व आर्थिक उन्नती साधण्याचा सहायक ठरेल असे मनोगत व्यक्त केले व गोकुळचे दूध उत्पादक दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
आम्ही मुश्रीफ साहेब, तसेच जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी गोकुळची सत्ता अडीच तीन वर्षांपूर्वी घेतली, तेव्हा शेतकऱ्याला जास्त पैसे मिळाले पाहिजे यासाठी पक्का निर्णय घेतला होता. त्यानुसार आत्तापर्यंत जवळजवळ १० रुपये शेतकऱ्यांला दिले जात होते. आता अजून २ रुपये म्हैशीच्या दुध खरेदीला वाढवून दिला जात आहे. कारण गोकुळचा युएसपी म्हैशीचं दुध आहे. त्याला मार्केट आहे. जिल्हाातून म्हैशीचं दूध वाढावं, शेतकऱ्यांना प्रोत्साहान मिळावं या हेतुने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया आमदरा सतेज पाटील यांनी माध्यमांना दिली.
म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ५२.८० वरून रूपये ५४.८० करण्यात आला आहे. तसेच ७.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५५.५० वरून रूपये ५७.५० करण्यात आला आहे. कोल्हापूर सह जिल्ह्याबाहेरील दूध उत्पादकांना याचा फायदा होणार आहे. तसेच दि.११/०१/२०२५ इ.रोजी पासून सुधारित दरपत्रक लागू होईल. संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना सुधारित दरपत्रक पाठवणेत येणार आहेत.