भारती एअरटेलकडून इंडस टॉवरमध्ये हिस्सेदारी खरेदी
नवी दिल्ली :
देशातील दिग्गज दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल यांनी टेलिकॉम प्रोव्हायडर कंपनी इंडस टॉवरमध्ये 1 टक्का इतकी हिस्सेदारी खरेदी केली आहे. बुधवारी भारती एअरटेलने यासंबंधीची माहिती शेअरबाजाराला दिली आहे.
इंडस टॉवरमधील जवळपास 2.695 कोटी समभाग कंपनीने खरेदी केले आहेत. यायोगे आता भारती एअरटेलचा इंडस टॉवरमधील एकंदर वाटा हा 49 टक्के इतका झाला आहे. बुधवारी नवी खरेदी करण्याआधी सुनील मित्तल यांच्या मालकीच्या भारती एअरटेलचा इंडस टॉवरमधील वाटा 47.95 टक्के इतका होता. तर दुसरीकडे ब्रिटीश कंपनी व्होडाफोन समूहाची पीएलसीने इंडसटॉवरमधील जवळपास 20 टक्के इतकी हिस्सेदारी विकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्होडाफोन समूहाने इंडस टॉवरमधील 53.3 कोटी समभाग 17,065 कोटी रुपयांना विकले आहेत. ही खरेदी खासगी इक्विटी फर्म आय स्कॅयर्ड कॅपिटल आणि स्टोनपीक यांनी केल्याचे समजते.
व्होडाफोन कमी करते आहे हिस्सेदारी
व्होडाफोन समूहातील पीएलसीला आपल्या भारतातील युनिटकडून मोठे नुकसान सोसावे लागले असल्याचे समजते. सदरच्या कंपनीने आता भारतात आणखी गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. कंपनीने 2022 मध्ये इंडस टॉवरमधील आपली 28 टक्के हिस्सेदारी विकण्याची घोषणा केली होती. टप्याटप्याने व्होडाफोन इंडसमधील हिस्सा कमी करते आहे.
इंडस टॉवर, भारतीचा समभाग घसरणीत
इंडसटॉवरचा समभाग शेअरबाजारात दुपारच्या सत्रात 2.89 टक्के इतक्या घसरणीसह 334 रुपयांवर व्यवहार करत होता. इंट्रा डे दरम्यान समभाग 10 टक्क्यांपर्यंत घसरला होता. समभागाचा भाव 311 रुपयांवर खाली आला होता. यासोबत भारती एअरटेलचे समभागदेखील घसरणीत राहिले होते. दुपारच्या सत्रात समभाग 0.90 टक्के घसरणीसह 1415 रुपयांवर व्यवहार करत होते. एक लक्षात घ्या की या समभागाने वर्षभरात गुंतवणूकदारांना 70 टक्के इतका परतावा दिला आहे.