For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रयोगशाळा साहित्य व उपकरणांची चढ्या दराने खरेदी

10:00 PM Jan 19, 2024 IST | Kalyani Amanagi
प्रयोगशाळा साहित्य व उपकरणांची चढ्या दराने खरेदी
Advertisement

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचा कारभार : 15 व्या वित्त आयोगातील प्राप्त अनुदानातून 2 कोटींची खरेदी
29 डिसेंबर 2023 काढला आहे पुरवठा आदेश : साहित्य पुरवठा करण्यासाठी 1 महिन्याची मुदत : रेफ्रिजरेटरची तिप्पट दराने खरेदी

Advertisement

कृष्णात चौगले / कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिह्यातील 75 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 413 उपकेंद्र आणि 16 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक प्रयोगशाळा साहित्य व उपकरणांची खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून 29 डिसेंबर 2023 रोजी साहित्य पुरवठा करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. 15 व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या 2 कोटी ऊपयेंच्या अनुदानातून प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेले 57 प्रकारचे साहित्य खरेदी केले आहे. यामध्ये अन्य जिह्यातील साहित्य खरेदीचे दर पाहता ही खरेदी चढ्या दराने आणि नियम डावलून केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या खरेदीमधून कोणी किती हात ओले केले आहेत ? हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 13 प्रकारच्या आरोग्य सेवा ऊग्णांना दिल्या जातात. यामध्ये माता बाल संगोपन कार्यक्रम, असंसर्गजन्य आजार कार्यक्रम, संसर्गजन्य आजार कार्यक्रम, योगा व आयुष, संदर्भ सेवा, प्रयोगशाळा सेवा आदी सेवांचा समावेश आहे. यामध्ये प्रयोगशाळा सेवेंतर्गत रक्त, लघवीसह सर्वसामान्य आजारांच्या तपासण्या केल्या जातात. त्यासाठी आवश्यक उपकरणे व साहित्यांची गरज आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी जि.प.च्या आरोग्य विभागाने साहित्य खरेदी केली आहे. पण ती चढ्या दराने केली असल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आले आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे ‘तरुण भारत संवाद’ च्या प्रस्तुत प्रतिनिधींकडे उपलब्ध झाली आहेत.

आरोग्य विभागाकडून ग्लुकोमीटर टेस्टींग स्ट्रीप, रॅपीड प्रेग्नन्सी टेस्टींग किट, डेंग्यू आणि मलेरिया टेस्टींग किट, हायड्रोक्लोरीक अ‍ॅसिड, सोडियम क्लोराईड सोल्युशन, बेंडीक्ट सोल्युशन, अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड सोल्युशन, स्क्रीनिंग टेस्ट किट, साल्ड आयोडिन टेस्ट किट, ग्लुकोमीटर, डिजिटल हिमोग्लोबीनोमीटर, ग्लुकोमीटर, रेफ्रिजरेटर, प्री पॅक्ड् अल्कोहोल स्वॅब स्टरलाईज, सिरींज 5 सीसी विथ 23 नंबर निडल, 3 लेअर मास्क, डिस्पोजल लॅन्सेट, बकेटस्, डस्ट बिन, डिस्पोजल बॅग्ज्, वॉश बेसिन, कर्टन, निडल् डिस्ट्रॉयर आदी 57 प्रकारचे साहित्य व उपकरणे खरेदी केली आहेत. या खरेदीच्या निविदे प्रक्रियेमध्ये सुमारे 21 ते 22 पुरवठाधारक सहभागी झाले हेते. त्यामधील सुमारे 3 पुरवठाधारकांकडून साहित्य खरेदी केले जाणार आहे. त्यानुसार सीईओ संतोष पाटील यांनी संबंधितांना पुरवठा आदेश दिला असून लवकरच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये साहित्य पोहोच केले जाण्याची शक्यता आहे. पण हे पुरवठाधारक तांत्रिकदृष्ट्या पात्र आहेत की नाहीत ? (अटी, शर्थींची पूर्तता) हे पाहिले नसल्याचा अन्य पुरवठाधारकांचा आरोप आहे.

खरेदी समितीची बैठक नाही ?

साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली असेल तर 1 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार खरेदी समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व उद्योग भवनचे महाव्यवस्थापक हे या समितीचे सदस्य असतात. पण प्रयोगशाळा साहित्य खरेदी प्रक्रियेमध्ये खरेदी समितीची बैठकच झाली नसल्याचे समजते.

खरेदी प्रक्रियेबाबत सीईओ अनभिज्ञ, की दिशाभूल ?

प्रयोगशाळा साहित्य खरेदीची प्रक्रिया ही जिल्हा परिषदेतील सीईओंच्या स्वाक्षरीने अंतिम होते. पुरवठा आदेश देखील त्यांच्याच स्वाक्षरीने निघाला आहे. पण आपल्या आरोग्य विभागाकडून खरेदी केले जाणारे साहित्य हे योग्य दरानुसार आहेत काय ? अन्य जिह्यातील खरेदीचे दर काय आहेत ? आपण कोणत्या दराने खरेदी करत आहोत ? त्यासाठी खरेदी समितीची बैठक घेणे आवश्यक आहे काय ? आदी बाबींची सीईओ संतोष पाटील यांनी पडताळणी केली की नाही ? अथवा त्यांची दिशाभूल झाली आहे ? याची जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा आहे.

रत्नागिरी जि.प.पेक्षा रेफ्रिजरेटरची तिप्पट दराने खरेदी

कोल्हापूर जिल्हा परिषदेने प्रति रेफ्रिजरेटर 1 लाख 79 हजार 500 ऊपये दराने 9 रेफ्रिजरेटरची (400 लिटर्स क्षमतेचा) 16 लाख 15 हजार 500 रूपयेंना खरेदी केली आहे. हीच क्षमता आणि गुणवत्ता असलेला एक रेफ्रिजरेटर रत्नागिरी जिल्हा परिषदेने 2 जानेवारी 2024 रोजी 58 हजार ऊपयांमध्ये खरेदी केला आहे. कोल्हापूर जि.प.कडून प्रति हिमोग्लोबीनोमीटर 11 हजार 250 ऊपये प्रमाणे 60 डिजिटल हिमोग्लोबीनोमीटरची खरेदी केली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून हेच उपकरण 4 हजार 900 ऊपये दराने खरेदी केले आहे. ग्लुको टेस्टींग स्ट्रीपदेखील तिप्पट दराने केली असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. कोल्हापूर जि.प.कडून 45 हजार ‘एन 95’ मास्कची 95 रूपये दराने (प्रति मास्क) खरेदी केली आहे. बाजारपेठेत होलसेल दरात या मास्कची किंमत प्रतिमास्क 25 रूपये असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. अन्य उपकरणांची खरेदी देखील अशीच चढ्या दराने झाली असल्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.